मुंबई : दक्षिण फ्लोरिडामधील एका निवासी भागात रविवारी दुपारी (स्थानिक वेळेनुसार) एक खासगी विमान कोसळलं. या विमानात तब्बल ९ लोक प्रवास करत होते. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) ने दिलेल्या माहितीनुसार, विमान कोसळताच तिथे आगीचा मोठा भडका उडाला. यानंतर बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आजूबाजूचे रस्ते वाहतुकीसाठी बंद केले.
फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, फ्लोरिडामधील क्रेस्टहेवन (Cresthaven) जवळ दुपारी १२:५० च्या सुमारास हा अपघात झाला. ही जागा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'मार-ए-लागो' (Mar-a-Lago) निवासस्थानापासून अवघ्या ९ मैल अंतरावर आहे. FAA ने दुजोरा दिलाय की, या विमानाने टेक्सासमधील ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं आणि ते बहामासमधील नॉर्थ एल्युथेरा विमानतळाकडे जात होतं.
"FAA आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) या अपघाताचा सविस्तर तपास करतील. या तपासाची मुख्य जबाबदारी NTSB कडे असेल आणि तेच पुढचे सर्व अपडेट्स देतील," असं एका अधिकृत निवेदनात सांगण्यात आलं आहे.
फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, बचाव पथकाने क्रेस्टहेवन बुलेवर्ड आणि १० व्या एव्हेन्यू नॉर्थ दरम्यानचा मिलिटरी ट्रेल रस्ता बंद केला आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी या भागात जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलंय. पाम बीच काउंटी फायर रेस्क्यूने 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट करत याला 'मोठी आणीबाणीची परिस्थिती' म्हटलंय आणि लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्याची विनंती केली आहे.
सोशल मीडियावर या घटनेचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात विमान वेगाने खाली येताना आणि त्यानंतर मोठा स्फोट होऊन आगीचे लोळ आणि धूर आकाशात पसरताना दिसतोय. फ्लाईट ट्रॅकिंग वेबसाईट Flightradar24 च्या माहितीनुसार, ऑस्टिनवरून उड्डाण केल्यानंतर या लिअरजेट (Learjet) विमानाने ४१,००० फूट उंची गाठली होती. फ्लोरिडामधील नेपल्सजवळ ते खाली यायला लागलं, त्यानंतर थोडं वर जाऊन ५:४८ वाजता (UTC) ते उजव्या बाजूने वेगाने खाली कोसळलं. आता FAA आणि NTSB या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.