
Russian An 26 Military Plane Crashes in Crimea : क्रिमिया द्वीपकल्पावर रशियाचं अँटोनोव्ह An-26 लष्करी विमान कोसळल्याची मोठी घटना घडली आहे. या अपघातात २३ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्ससह एकूण २९ जणांचा मृत्यू झाला. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं बुधवारी पहाटे ही माहिती दिली. ३१ मार्च रोजी मॉस्को वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता या विमानानं उड्डाण केलं होतं, त्यानंतर अचानक त्याचा संपर्क तुटला. हे विमान ठरलेल्या मार्गावरच होतं, पण अनपेक्षितपणे हा अपघात घडला.
अद्याप अधिकाऱ्यांनी या अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट केलेलं नाही. प्राथमिक माहितीनुसार, विमानाच्या अवशेषांवर बाहेरून कोणत्याही हल्ल्याच्या किंवा धडकेच्या खुणा सापडलेल्या नाहीत. त्यामुळे तांत्रिक बिघाड किंवा सिस्टीम फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.
हा अपघात अशा वेळी झाला आहे, जेव्हा युक्रेननं रशियातील तेल आणि पायाभूत सुविधांवर ड्रोन हल्ले वाढवले आहेत. या हल्ल्यांमुळे रशियाची मोठी तेल बंदरं आणि पाइपलाइन्सचं मोठं नुकसान झालं आहे. तज्ज्ञांच्या मते, रशियाचं तेलातून मिळणारं उत्पन्न आणि लष्करी ताकद कमी करणं, हा युक्रेनचा मुख्य उद्देश आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे अलीकडे रशियाच्या तेल निर्यातीत जवळपास ४०% घट झाली आहे. यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आला असून, त्यांना आशियाई बाजारांवर अवलंबून राहावं लागत आहे. काही रिपोर्ट्सनुसार, विमान कोसळण्याच्या काही वेळापूर्वीच सेवस्तोपोलमध्ये हवाई हल्ल्याचा सायरन वाजला होता. अर्थात, त्याचा या अपघाताशी थेट संबंध आहे की नाही, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
गेल्या काही वर्षांत रशियामध्ये An-26 आणि इतर अँटोनोव्ह विमानांचे अनेक अपघात झाले आहेत. जुलै २०२५ मध्ये अमूर प्रदेशात झालेल्या An-24 विमान अपघातात ४८ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०२१ मध्ये झालेल्या An-26 विमानांच्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये एकूण ३४ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
या घटनांनंतर रशियाने देशभरात सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली आहे. युक्रेनच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना लष्करानेही जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विमान अपघाताच्या कारणांचा तपास सुरू असून लवकरच सत्य समोर येईल.