
Relationship: नातेसंबंधांमध्ये संवाद हा विश्वास, आदर आणि भावनिक सुरक्षितता निर्माण करणारा मुख्य दुवा आहे. प्रभावी संवादाने गैरसमज दूर होऊन संघर्ष कमी होतात आणि भावनिक जवळीक वाढते, ज्यामुळे नाते अधिक मजबूत व टिकणारे बनते. संवादामुळे भावना, गरजा आणि अपेक्षा स्पष्टपणे व्यक्त होतात, ज्यामुळे विश्वास निर्माण होतो आणि नाते मजबूत होते. "जिथे संवाद संपतो, तिथे नाते कमकुवत होऊ लागते," असे म्हटले जाते. त्यामुळे निरोगी नातेसंबंधासाठी दररोज किंवा प्रसंगी मनापासून संवाद साधणे गरजेचे आहे.
याशिवाय दीर्घ आणि यशस्वी वैवाहिक जीवनाचे रहस्य काय आहे, यावर नेहमीच चर्चा होत असते. परस्पर विश्वास, संयम, समजूतदारपणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चांगला संवाद हे सुखी वैवाहिक जीवनाचे मूळ मंत्र मानले जातात. पण या सर्व सामान्य कल्पनांच्या विरुद्ध, जपानमधील एका जोडप्याने एकमेकांशी एक शब्दही न बोलता सुमारे दोन दशके संसार केला आणि त्यांना तीन मुलेही झाली. ही एक दुर्मिळ घटना आहे, जिने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
दक्षिण जपानच्या नारा शहरात राहणारे ओटाऊ कटायमा आणि त्यांची पत्नी युमी कटायमा यांच्या वैवाहिक जीवनाची कहाणी आश्चर्यकारक आणि वेदनादायक आहे. 1997 ते 2017 पर्यंत, म्हणजे सुमारे 20 वर्षे, ओटाऊ यांनी आपल्या पत्नीशी बोलणे बंद केले होते. एकाच घरात राहूनही, ते कोणत्याही संवादाशिवाय वैवाहिक जीवन जगत होते.
युमी आपल्या पतीशी बोलण्याचा सतत प्रयत्न करत असे. पण पतीने काहीही विचारले तरी ते फक्त मान डोलावत. या गंभीर अबोल्याच्या काळातही, हे जोडपे एकत्र राहिले, त्यांनी तीन मुलांना वाढवले आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. दोन मुली या मौनापूर्वीच जन्माला आल्या होत्या. तर सर्वात धाकटा मुलगा त्यांच्या मौन काळात जन्माला आला!
या असामान्य वैवाहिक जीवनाचे रहस्य उघड झाले ते या जोडप्याचा धाकटा मुलगा योशिकीमुळे. 18 वर्षांच्या योशिकीने आपल्या आई-वडिलांना कधीही एकमेकांशी बोलताना पाहिले नव्हते. या विचित्र परिस्थितीला कंटाळून त्याने जपानमधील प्रसिद्ध टीव्ही शो 'टीव्ही होक्काइडो'ला पत्र लिहून मदत मागितली.
शोच्या टीमने या जोडप्याची कहाणी जाणून घेतली आणि त्यांच्यात पुन्हा संवाद सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. ओटाऊ आणि युमी यांची भेट ज्या पार्कमध्ये पहिल्यांदा झाली होती, तिथेच त्यांची पुन्हा भेट घडवून आणली. तो खास क्षण त्यांची मुले दूरवरून डोळ्यात पाणी आणून पाहत होती.
अनेक वर्षांच्या मौनानंतर, ओटाऊ कटायमा अखेर आपल्या पत्नीशी बोलले. "इतक्या वर्षांनंतर तुझ्याशी बोलणे विचित्र वाटत आहे. तू इतके दिवस जे काही सहन केलेस, त्याबद्दल मी तुझा आभारी आहे," असे ते भावूक होऊन म्हणाले. आपल्या मौनामुळे युमीला त्रास झाल्याचे त्यांनी मान्य केले आणि माफी मागितली.
या मौनामागचे कारणही नंतर समोर आले. युमी आपल्या मुलांच्या संगोपनाकडे जास्त लक्ष देत असल्यामुळे आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे, असे ओटाऊ यांना वाटू लागले होते. सुरुवातीला यामुळे त्यांना दुःख झाले, पण नंतर त्याचे रूपांतर मत्सरात झाले. याच नाराजीमुळे त्यांनी अबोला धरला, जो तब्बल 20 वर्षे टिकला.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या सर्व वर्षांमध्ये युमीने घटस्फोट किंवा विभक्त होण्याचा विचार केला नाही. पतीच्या अबोल्यानंतरही त्यांनी कुटुंब एकत्र ठेवले आणि मुलांना वाढवले. पती बोलत नसला तरी, त्यांनी आपले जीवन त्याच्यासोबतच व्यतीत केले. 20 वर्षांच्या अबोल्यानंतर, मुलांच्या प्रयत्नांमुळे अखेर या नात्यात पुन्हा संवाद सुरू झाला. ही घटना वैवाहिक जीवनात संवादाचे महत्त्व तर अधोरेखित करतेच, पण संयमाच्या मर्यादांवरही प्रश्नचिन्ह निर्माण करते. जपानची ही अनोखी कहाणी मानवी भावना, मत्सर, मौन आणि संयम हे सर्व एकाच कुटुंबात कसे एकत्र नांदू शकतात, याचे एक दुर्मिळ उदाहरण आहे.