PM Modi in Russia : राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींचे म्हणणे मान्य करत रशियन सैन्यात अडकलेल्या भारतीय तरुणांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
PM Modi in Russia : मॉस्को : रशिया आणि युक्रेनमधील युद्धात आघाडीवर लढणाऱ्या भारतीय नागरिकांचाही यात सहभाग आहे. रशियन सैन्याच्यावतीने लढणाऱ्या अनेक भारतीयांचाही मृत्यू झाला आहे. रशियाने आपल्या लष्कराच्यावतीने लढणाऱ्या भारतीय नागरिकांना सुट्टी देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये सोमवारी अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
रशियन सैन्यात अडकलेल्या भारतीयांना दिली जाणार सुट्टी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत झालेल्या एका खाजगी डिनरच्या संभाषणात पंतप्रधान मोदींनी हा मुद्दा उपस्थित केला होता. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी सहमती दर्शवत रशियन सैन्यात अडकलेल्या भारतीय तरुणांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 4 जुलै रोजी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेपूर्वी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्याकडे हा मुद्दा जोरदारपणे मांडला होता.
युद्धात भारतीयांचा कपटाने केला समावेश
युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाच्यावतीने लढताना किमान दोन भारतीयांचा मृत्यू झाला आहे, तर युद्धक्षेत्रात अडकलेल्या डझनभर लोकांचा दावा आहे की त्यांना युद्धात सामील करण्यासाठी फसवले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, अजूनही 30 ते 40 भारतीयांना रशियन लष्करात काम करण्यास भाग पाडले जात आहे.
22व्या भारत-रशिया शिखर परिषदेतही पंतप्रधान मोदी सहभागी होणार
पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळी मॉस्कोला पोहोचले. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच रशिया दौरा आहे. रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मँतुरोव यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्याचवेळी, पंतप्रधान मोदी सोमवारी पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार असून मॉस्कोमध्ये होणाऱ्या 22व्या भारत-रशिया शिखर परिषदेतही ते सहभागी होणार आहेत.
आणखी वाचा :