
मुंबई : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील पालमैदान भागात बुधवारी सुरक्षा दलांनी शोध मोहीम राबवली. या कारवाईत लष्कर-ए-तैयबा (LeT) या दहशतवादी संघटनेच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा मृतदेह सापडला आहे. मोहम्मद आसिफ ऊर्फ हाशिम मुसा असं या दहशतवाद्याचं नाव असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.
श्रीनगरमधील चिनार कॉर्प्सने मुसा मारला गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितलं की, "पालमैदान भागात पहाटेच्या सुमारास शोध मोहीम सुरू होती. त्यावेळी लष्कर-ए-तैयबाचा पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद आसिफ ऊर्फ हाशिम मुसा याचा मृतदेह आणि काही शस्त्रे सापडली."
बुधवारी लष्कर आणि इतर सुरक्षा यंत्रणांना युसमार्ग भागात दहशतवादी लपल्याची पक्की माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी 'ऑपरेशन कोराग' (OP KORAG) सुरू केलं. या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान जवानांना काही संशयास्पद हालचाली दिसल्या. जवानांनी त्यांना थांबण्याचा इशारा देताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार चकमक उडाली आणि यात हाशिम मुसाचा खात्मा झाला.
सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात अजूनही शोध मोहीम सुरू आहे. २०२५ मध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा बळी गेला होता. या हल्ल्यातील मुख्य संशयितांपैकी हाशिम मुसा हा एक होता. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी पाकिस्तानी नागरिक आणि लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी आदिल हुसेन ठोकर, अली भाई आणि हाशिम मुसा यांना पकडून देणाऱ्याला २० लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाशिम मुसा हा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपमध्ये (SSG) पॅरा-कमांडो म्हणून काम करत होता.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) याआधीच पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी सात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे. यात पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि तिचीच दुसरी शाखा असलेली द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांचा समावेश आहे. या हल्ल्याचं प्लॅनिंग आणि अंमलबजावणी करण्यात या संघटनांचा कसा हात होता, याचा सविस्तर खुलासा NIA ने केला आहे. या १५९७ पानांच्या आरोपपत्रात साजिद जट या पाकिस्तानी हँडलरचं नावही आरोपी म्हणून नोंदवण्यात आलं आहे.
दहशतवाद्याचा मृतदेह आणि शस्त्रसाठा सापडणं हा या सुरू असलेल्या कारवाईचाच एक भाग आहे. आजूबाजूच्या परिसरात आणखी काही दहशतवादी लपले आहेत का, हे तपासण्यासाठी सुरक्षा दलांची शोध मोहीम अजूनही सुरूच आहे.