Sajid Tarar: 'इस्रायल जगाचा बाप, पाकिस्तानी तज्ज्ञाचा मुस्लिम देशांना घरचा आहेर

Published : Mar 03, 2026, 04:03 PM IST
Pakistani Analyst Sajid Tarar Says Muslim Nations Should Surrender to Israel

सार

Pakistani Analyst Sajid Tarar Says Muslim Nations Should Surrender to Israel: इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी तज्ज्ञ साजिद तरार यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, मुस्लिम जगाने इस्रायलसमोर शरणागती पत्करावी.

इस्लामाबाद (ता. ३): इराण आणि इस्रायलमधील युद्ध दिवसेंदिवस भीषण होत चाललं आहे. अशातच, पाकिस्तानी वंशाचे तज्ज्ञ साजिद तरार यांनी एक खळबळजनक विधान केलंय. 'संपूर्ण मुस्लिम जगाने इस्रायलसमोर गुडघे टेकून शरणागती पत्करावी,' असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानामुळे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

'इस्रायल आता जगाचा बाप आहे': साजिद तरार यांचं विश्लेषण

आखाती देशांच्या (GCC) शांततेवर नाराजी व्यक्त करत साजिद तरार यांनी आपलं मत मांडलं आहे. त्यांच्या मते, सध्या जग एकध्रुवीय झालं आहे. 'आज रशिया किंवा चीन कुठेच दिसत नाही. सत्ता कोणाच्या हातात आहे? बेंजामिन नेतान्याहू हे आज पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत. मुस्लिम राष्ट्रांनी इस्रायलला आपले आई-वडील मानून, 'देवा, आम्ही गुडघे टेकले आहेत' असं म्हणत शरणागती पत्करणंच योग्य ठरेल,' असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे. जगाची सुरुवात इस्रायलपासून होते आणि तिथेच संपते, असंही ते म्हणाले.

युद्ध सुरू राहिल्यास शेखांची अवस्था बिकट!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'चार आठवड्यांच्या युद्धा'च्या वक्तव्यावर चिंता व्यक्त करत तरार यांनी इशारा दिला आहे. "जर हे युद्ध एक आठवडा जरी चाललं, तरी जगाची अर्थव्यवस्था डळमळीत होईल. तेव्हा दुबईचे श्रीमंत शेख आणि लाहोरचे शेख एका पातळीवर येतील (म्हणजेच गरीब होतील)," असं ते म्हणाले. गाझामध्ये दिवसाढवळ्या लाखो लोकांची कत्तल होत असतानाही कुणी विचारायला तयार नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

तेलाच्या किमती भडकल्या: इराणमध्ये मृत्यूचं तांडव

इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यांमुळे इराणमधील मृतांचा आकडा ७४२ च्या पुढे गेला आहे. या युद्धाची झळ जागतिक बाजारपेठेलाही बसली असून, कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १५० डॉलरवर पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वीच इराणने केलेल्या हल्ल्यात बीट शेमेश भागातील नऊ इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता. या भागाला भेट दिल्यानंतर नेतान्याहू यांनी, 'इराणच्या दहशतवादी राजवटीला आम्ही अण्वस्त्रं मिळवू देणार नाही,' असा इशारा दिला.

जगाला वाचवण्यासाठी आमचा लढा: नेतान्याहू यांचं समर्थन

इराणचा अणुबॉम्ब आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम फक्त इस्रायलसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी धोकादायक असल्याचा दावा नेतान्याहू यांनी केला आहे. 'आम्ही आमचं संरक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे, पण असं करून आम्ही संपूर्ण जगाला वाचवत आहोत,' असं म्हणत त्यांनी आपल्या लष्करी कारवाईचं समर्थन केलं आहे. बॅलिस्टिक आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्रे असलेल्या इराणविरोधात इस्रायलने आता निर्णायक लढा सुरू केल्याचं स्पष्ट झालं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Gulf Crisis : आखाती देशांत विमाने ठप्प, भारतीय अडकले; दूतावास मदतीला धावले!
Dubai Attack: दुबईत इराणचा डबल स्ट्राइक; US आणि ऑस्ट्रेलियन तळांवर ड्रोन हल्ला!