मुंबई : पाकिस्तानात सध्या एलपीजी (LPG) गॅसचे दर ऐकून सर्वसामान्यांना घाम फुटला आहे. खैबर पख्तूनख्वा (K-P) प्रांतात काही ठिकाणी एका किलो गॅसचा दर ७५० रुपयांवर पोहोचला आहे. एक पूर्ण सिलिंडर घ्यायचा असेल तर खिशातून १० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जातेय! 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'च्या रिपोर्टनुसार, सरकारचं यावर कोणतंही नियंत्रण नाही. त्यामुळे व्यापारी मनमानी करत भाव वाढवत आहेत. परिणामी स्वस्तात गॅस मिळण्याची आशा लोकांनी सोडूनच दिली आहे.
गेल्या पाच-सहा दिवसांत परिस्थिती आणखीनच बिघडली आहे, असं 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'ने म्हटलंय. बाजारात गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. इराण आणि अमेरिकेतील तणावामुळे ताफ्तान सीमा बंद करण्यात आली आहे. त्यामुळेच हे संकट ओढावल्याचं बोललं जातंय. ऑइल अँड गॅस रेग्युलेटरी अथॉरिटी (OGRA) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, पाकिस्तानला त्यांच्या एकूण एलपीजी गरजेच्या जवळपास ७० टक्के गॅस परदेशातून आयात करावा लागतो. देशात फक्त ३० टक्केच उत्पादन होतं.
ओगरा (OGRA) ने या महिन्यासाठी एका किलो एलपीजीचा सरकारी दर २७९.३४ रुपये ठरवून दिला होता. पण बाजारात हे कोणीच ऐकत नाहीये. वेगवेगळ्या बाजारात ग्राहकांना एका किलोसाठी ५५० ते ६०० रुपये मोजावे लागत आहेत. पेशावरमध्ये हाच दर जवळपास ६०० रुपयांवर गेलाय. तर खैबर पख्तूनख्वाच्या उत्तरेकडील भागात एक किलो गॅस ७५० रुपयांना विकला जातोय.
जास्त पैसे उकळणाऱ्या कंपन्या किंवा विक्रेत्यांवर नियामक संस्थेने अद्याप कोणतीही कडक कारवाई केलेली नाही. कडक पावलं उचलली तर संप पुकारला जाईल, अशी भीती अधिकाऱ्यांना वाटतेय. तसं झालं तर गॅस पुरवठा पूर्णपणे ठप्प होईल आणि देशातील इंधन संकट आणखी भयंकर रूप धारण करेल. पुरवठा आणखी कमी झाला तर काही बाजारांमध्ये दर ७०० रुपयांच्याही पुढे जाऊ शकतो, असं ओगराच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.
ताफ्तान सीमा बंद असल्यामुळेच ही अडचण निर्माण झाल्याचं ओगराच्या एका प्रवक्त्याने मान्य केलं आहे. पण परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केलाय. हे संकट लवकरच दूर होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे, असं 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'च्या बातमीत म्हटलंय.
गॅसच्या या वाढत्या किमतींमुळे कमी उत्पन्न असलेल्या लोकांचे सर्वाधिक हाल होत आहेत. खैबर पख्तूनख्वा भागात आधीच नैसर्गिक गॅसची कमतरता आहे. त्यात एलपीजीचे हे वाढलेले दर म्हणजे दुष्काळात तेरावा महिना ठरत आहेत. पेशावरच्या आजूबाजूच्या गावांमध्ये एलपीजी विकत घेणं आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलंय, असं 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'ने सांगितलंय. नैसर्गिक गॅस तर मिळतच नाहीये. त्यामुळे नाईलाजाने गावातील लोक स्वयंपाकासाठी लाकूडफाट्यावर अवलंबून आहेत.