
Pakistan Afghanistan Conflict : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. अफगाण सरकारच्या एका वरिष्ठ प्रवक्त्याने दावा केला आहे की, पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात काबूलमधील एका हॉस्पिटलला लक्ष्य करण्यात आले, ज्यात आतापर्यंत सुमारे 400 लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर हॉस्पिटलचा मोठा भाग जमीनदोस्त झाला आणि इमारतीला भीषण आग लागली. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये जळती इमारत, धुराचे लोट आणि बचावकार्य स्पष्ट दिसत असून, या घटनेने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे.
अफगाण सरकारचे उप-प्रवक्ते हमदुल्लाह फिटरत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले की, सोमवारी रात्री उशिरा काबूलमध्ये झालेल्या एअरस्ट्राईकमध्ये एका ड्रग ट्रीटमेंट हॉस्पिटलचे मोठे नुकसान झाले. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत 400 लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे आणि सुमारे 250 लोक जखमी आहेत. फिटरत यांच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यानंतर इमारतीचे अनेक भाग पूर्णपणे कोसळले आहेत. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव पथके आग विझवण्यासाठी आणि मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
अफगाणिस्तानचे सरकारी प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी सांगितले की, हॉस्पिटलमध्ये असलेले बहुतेक लोक उपचार घेत असलेले रुग्ण होते. हॉस्पिटलचे जवळपास सर्वच भाग उद्ध्वस्त झाले असून, मोठ्या संख्येने रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचारी या हल्ल्याचे बळी ठरले आहेत. स्थानिक मीडियानुसार, हल्ल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. अनेक तास आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते आणि आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
या संपूर्ण प्रकरणी पाकिस्तानने अफगाणिस्तानचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, पाकिस्तानी लष्कराने कोणत्याही नागरी ठिकाणाला लक्ष्य केलेले नाही. पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयानुसार, हे हवाई हल्ले फक्त दहशतवादी तळ आणि लष्करी ठिकाणांवर करण्यात आले. यामध्ये शस्त्रास्त्रांची गोदामे आणि दहशतवाद्यांची लॉजिस्टिक सेंटर्स निशाण्यावर होती. नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी ही कारवाई अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली. पाकिस्तानने अफगाणिस्तानचे आरोप 'दिशाभूल करणारे आणि खोटे' असल्याचे म्हटले आहे.
काबूलमधील एअरस्ट्राईकच्या दाव्यासोबतच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरही तणाव झपाट्याने वाढला आहे. अफगाण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानकडून डागण्यात आलेले मोर्टार दक्षिण-पूर्व खोस्त प्रांतातील गावांमध्ये पडले, ज्यात दोन मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे, पाकिस्तानचे म्हणणे आहे की, अफगाणिस्तानकडून डागलेला मोर्टार त्यांच्या बाजौर जिल्ह्यात एका घरावर पडला, ज्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा जीव गेला. तज्ज्ञांच्या मते, ही चकमक अलिकडच्या वर्षांतील दोन्ही देशांमधील सर्वात धोकादायक संघर्ष ठरू शकते.
वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनेही अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. परिषदेने दहशतवादी कारवायांचा निषेध करत अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्रांचे राजकीय मिशन UNAMA चा कार्यकाळ तीन महिन्यांसाठी वाढवला आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार पाकिस्तानविरोधी दहशतवादी संघटनांना आश्रय देत असल्याचा आरोप पाकिस्तान बऱ्याच काळापासून करत आहे, मात्र काबूलने हे आरोप सातत्याने फेटाळले आहेत.