Nvidia CEO Jensen Huang : 'माझ्याकडे कॉम्प्युटरच नाही', एनव्हिडियाच्या CEO चं कमबॅक आणि कर्मचाऱ्यांचा जल्लोष

Published : Nov 24, 2026, 03:10 PM IST
NVIDIA CEO Jensen Huang

सार

वादग्रस्त प्रकरणानंतर राजीनामा दिलेल्या एनव्हिडियाचे सीईओ जेन्सन हुआंग यांचं पुन्हा कंपनीत कमबॅक झालं आहे. त्यांच्या परतण्याने मुख्यालयात कर्मचाऱ्यांनी मोठा जल्लोष केला.

मुंबई : अमेरिकन टेक अब्जाधीश आणि एआय क्षेत्रातील दिग्गज कंपनी एनव्हिडियाचे सह-संस्थापक आणि सीईओ जेन्सन हुआंग यांचं पुन्हा एकदा कंपनीच्या सर्वोच्च पदी पुनरागमन झालं आहे. सोमवारी, २३ नोव्हेंबर रोजी कॅलिफोर्नियातील सांता क्लारा येथील कंपनीच्या मुख्यालयात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

विवाहबाह्य संबंध आणि ॲलिस हुआंग या महिलेसोबतच्या संबंधांच्या आरोपांनंतर जेन्सन हुआंग यांनी ११ दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ॲलिस हुआंग ही चायनीज गुप्तहेर असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, ज्यामुळे कंपनीत नेतृत्वाचं संकट निर्माण झालं आणि सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. पण आता ११ दिवसांनंतर जेन्सन हुआंग पुन्हा एनव्हिडियाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळण्यासाठी परतले आहेत.

एआय क्षेत्रातील या दिग्गज कंपनीच्या सीईओ पदी हुआंग यांच्या पुनरागमनामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये ३१.४८% ची मोठी उसळी पाहायला मिळाली. सोमवारी हे शेअर्स १६५.०५ डॉलर्सवर बंद झाले, ज्यामुळे कंपनीच्या मार्केट व्हॅल्यूमध्ये तब्बल ९५२ अब्ज डॉलर्सची भर पडली. अमेरिकन शेअर बाजाराच्या इतिहासात एकाच दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे.

'माझ्याकडे कॉम्प्युटर नाहीये'

जेन्सन हुआंग यांचं एनव्हिडियाचे सीईओ म्हणून पुनरागमन होताच कंपनीच्या मुख्यालयात जणू सणासारखं वातावरण होतं. कर्मचाऱ्यांनी लॉबीचे तीनही मजले खचाखच भरले होते. ते आत येताच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि 'जेन्सन! जेन्सन! जेन्सन!' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या भारावलेल्या वातावरणातही या अनुभवी लीडरने माहौल हलका-फुलका करण्याचा प्रयत्न केला. "माझ्या पहिल्याच दिवशी काम करायला माझ्याकडे कॉम्प्युटरच नाहीये," अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. "आयटी डिपार्टमेंट मला 'आरटीएक्स स्पार्क' (RTX Spark) देईल," अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. आरटीएक्स स्पार्क हा एनव्हिडियाचा एआय-फोकस्ड सुपरचिप प्लॅटफॉर्म आहे, जो नेक्स्ट जनरेशन विंडोज लॅपटॉप आणि कॉम्पॅक्ट डेस्कटॉप पीसीसाठी डिझाइन केला आहे.

"आज माझा कामाचा पहिला दिवस आहे. माझ्याकडे कॉम्प्युटर नाहीये, त्यामुळे आयटी विभाग मला नवीन पीसी देणार आहे. मला आशा आहे की तो आरटीएक्स स्पार्क असेल," हुआंग यांनी मस्करीत म्हटलं. त्यांच्या या बोलण्यावर मुख्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये हशा पिकला.

जेन्सन हुआंग यांनी १९९३ मध्ये ख्रिस मालाचोव्स्की आणि कर्टिस प्रीम यांच्यासोबत मिळून एनव्हिडियाची सुरुवात केली होती. आज ते जगातील सर्वात प्रभावशाली टेक्नॉलॉजी लीडर्सपैकी एक बनले आहेत. त्यांनी एका ग्राफिक्स-चिप मेकर कंपनीला जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बूमचा कणा बनवलं आहे.

११ दिवसांच्या वादळी काळानंतर त्यांच्या पुनरागमनाने केवळ वॉल स्ट्रीटवरील गुंतवणूकदारांचा विश्वासच परत मिळवला नाही, तर एनव्हिडियाच्या कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल असलेली निष्ठाही दिसून आली.

'मला खूप खेद वाटतोय'

एनव्हिडियाच्या सांता क्लारा येथील मुख्यालयात आपल्या पुनरागमनाबद्दल बोलताना जेन्सन हुआंग थोडे भावूकही झाले. सुरुवातीच्या मिश्किल टिप्पण्यांनंतर त्यांनी थेट कर्मचाऱ्यांची माफी मागितली आणि 'दुसऱ्या डावात एक चांगला सीईओ बनण्याचं' वचन दिलं.

"मला तुम्हा सर्वांचे आभार मानायचे आहेत. मी तुम्हा सर्वांना या सगळ्याला सामोरं जावं लागलं, यासाठी मला खूप खेद वाटतोय. मी काही अत्यंत भयानक चुका केल्या आहेत आणि मी आता पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी काम करणार आहे," जेन्सन यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं.

"मला दुसरी संधी दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. मी माझ्या दुसऱ्या डावात एक चांगला सीईओ बनून दाखवेन," असंही ते म्हणाले.

जेन्सन हुआंग यांनी एनव्हिडियाच्या सीईओ पदाचा राजीनामा दिल्यानंतर, चिफ फायनान्शिअल ऑफिसर (CFO) कोलेट क्रेस यांची इंटरिम चिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जेणेकरून नेतृत्वातील बदलाच्या काळात कंपनीचा गाडा सुरळीत चालवता येईल. आता हुआंग यांच्या पुनरागमनानंतर क्रेस आपल्या आधीच्या भूमिकेत परतल्या आहेत.

जेन्सन हुआंग यांच्या परतण्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढण्याची आणि एनव्हिडियाचा लाँग-टर्म आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा मार्ग अधिक स्थिर होण्याची अपेक्षा आहे. सध्या कंपनीचं अंतर्गत स्वतंत्र पुनरावलोकन सुरू असलं, तरी नेतृत्वाचं हे संकट आता मागे पडलं आहे.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Jensen Huang : 'वुई लव्ह यू, जेन्सन!' एनव्हिडियाचे सीईओ कार्यालयात परतले, कर्मचाऱ्यांनी दिला हिरोसारखा प्रतिसाद
Global Oil Routes : जगातील तेल बाजारावर नियंत्रण ठेवणारे 5 महत्त्वाचे सागरी मार्ग