Medical Miracle : वैद्यकीय जगात चमत्कार! एकाच बाळाचा दोनदा जन्म, वाचा थरारक कहाणी

Published : Sep 23, 2026, 09:18 AM IST
Medical Miracle : वैद्यकीय जगात चमत्कार! एकाच बाळाचा दोनदा जन्म, वाचा थरारक कहाणी

सार

वैद्यकीय विज्ञान किती प्रगत झालंय, याचं एक उत्तम उदाहरण अमेरिकेतील टेक्सासमध्ये पाहायला मिळालं. इथल्या डॉक्टरांनी आईच्या गर्भातून बाळाला बाहेर काढलं, त्याच्यावर शस्त्रक्रिया केली आणि पुन्हा गर्भात ठेवलं. त्यानंतर या बाळाने दुसऱ्यांदा या जगात पाऊल ठेवलं.

टेक्सास : ही कुठल्याही सिनेमाची कथा नाही, तर वैद्यकीय जगात घडलेला एक खराखुरा चमत्कार आहे. विचार करा, एकाच बाळाचा दोनदा जन्म होऊ शकतो का? कल्पनेच्या पलीकडची ही गोष्ट आहे. पण कधीकधी असे चमत्कार खरोखर घडतात. अमेरिकेत डॉक्टरांसमोर एक मोठं आव्हान उभं ठाकलं होतं, पण या कठीण प्रसंगाचा शेवट अतिशय गोड झाला.

थरारक कहाणी...

अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या मार्गारेट बोमर यांची ही कहाणी आहे. त्या गरोदर होत्या. १६ आठवडे (म्हणजेच चार महिने) पूर्ण झाल्यानंतर त्या रुटीन चेकअपसाठी डॉक्टरांकडे गेल्या. डॉक्टरांनी स्कॅनिंग केलं आणि एक धक्कादायक माहिती समोर आली. गर्भातील मुलीच्या माकडहाडाजवळ (Tailbone) एक मोठी गाठ वाढत होती. वैद्यकीय भाषेत याला 'सॅक्रोकोक्सीजियल टेराटोमा' (Sacrococcygeal Teratoma) म्हणतात. हे पाहून डॉक्टरही चक्रावून गेले.

ही गाठ खूप धोकादायक होती. जशी जशी गाठ वाढत होती, तसतशी ती बाळाच्या शरीरातील रक्त शोषून घेत होती. यामुळे भविष्यात बाळाच्या शरीरात रक्त कमी पडून, गर्भातच हार्ट फेल्युअरने बाळाचा मृत्यू होण्याचा मोठा धोका होता.

आईचा गर्भपातास नकार, पुढे काय?

डॉक्टरांनी ही परिस्थिती मार्गारेट यांना समजावून सांगितली. याआधीही त्या गरोदर होत्या आणि त्यांना जुळी मुलं होणार होती, पण सुरुवातीलाच त्यांचा गर्भपात झाला होता. त्यामुळे यावेळी कोणत्याही परिस्थितीत बाळाला वाचवायचंच, असा ठाम निश्चय त्यांनी केला होता. म्हणूनच त्यांनी गर्भपातास स्पष्ट नकार दिला. डॉक्टरांनी गर्भपाताचा सल्ला देऊनही या आईने आशा सोडली नाही. अखेर डॉक्टरांनी एका अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवला. यात बाळ वाचण्याची शक्यता फक्त ५० टक्के होती. तरीही मार्गारेट यांनी या सर्जरीला होकार दिला.

पुढे काय घडलं?

गर्भधारणेला २३ आठवडे पूर्ण होताच बाळाच्या हृदयाचे ठोके थांबण्याची वेळ आली होती. तेव्हा डॉक्टरांनी हे धाडसी पाऊल उचललं. त्यांनी आईच्या गर्भाशयावर शस्त्रक्रिया करून ते उघडलं आणि बाळाच्या शरीराचा खालचा अर्धा भाग बाहेर काढला. त्यावेळी बाळ नाळेच्या मदतीने श्वास घेत होतं. तब्बल २० मिनिटे बाळाला गर्भाबाहेर ठेवण्यात आलं. या वेळेत डॉक्टरांनी त्या चिमुकल्या शरीरावरील मोठी गाठ यशस्वीपणे कापून काढली.

अंगावर काटा आणणारी आणखी एक गोष्ट म्हणजे, ऑपरेशनदरम्यान एकदा बाळाच्या हृदयाचे ठोके थांबले होते. पण डॉक्टरांनी तात्काळ प्रयत्न करून बाळाला जीवदान दिलं. गाठ काढल्यानंतर डॉक्टरांनी बाळाला पुन्हा अत्यंत अलगदपणे आईच्या गर्भात ठेवलं आणि गर्भाशयाला टाके घालून ते बंद केलं.

३६ व्या आठवड्यात चिमुकलीचा जन्म

ऑपरेशननंतर आईला पूर्णपणे बेड रेस्ट सांगण्यात आली. इकडे बाळ गर्भात नेहमीप्रमाणे नैसर्गिकरीत्या वाढू लागलं. ३६ आठवड्यांनंतर डॉक्टरांनी सिझेरियन करून बाळाला बाहेर काढलं. अशा प्रकारे या बाळाने दुसऱ्यांदा जगात पाऊल ठेवलं. रिपोर्ट्सनुसार, हे बाळ आता पूर्णपणे निरोगी आहे. जन्मानंतर ८ दिवसांनी एक छोटी सर्जरी करून गाठीचा उरलेला भागही काढण्यात आला. आईच्या गर्भातून बाहेर येऊन जीव वाचवणं आणि पुन्हा गर्भात जाऊन जन्म घेणं... या बाळाची ही कहाणी वैद्यकीय जगात एखाद्या चमत्कारापेक्षा नक्कीच कमी नाही.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Kim Jong Un Dead : किम जोंग उनचा मृत्यू? प्योंगयांगमध्ये ९००० चिनी सैनिक, अफवांना उधाण
सीमा बंद करा, नाहीतर युरोप उद्ध्वस्त होईल; ट्रम्प यांचा फ्रान्सला इशारा