
मुंबई : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याच्या प्रकृती आणि मृत्यूच्या अफवांनी पुन्हा एकदा जगभरात मोठी चर्चा सुरू केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही पोस्ट्समध्ये प्योंगयांगमध्ये मोठा सत्तापालट झाल्याचा दावा केला जातोय. उत्तर कोरियातील राजवट कोसळण्याच्या मार्गावर असल्याने चिनी लष्कर तिथे घुसल्याचंही या पोस्ट्समध्ये म्हटलंय. पण या मोठ्या दाव्यांमागचं नेमकं सत्य काय आहे? या प्रश्नाने आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
चायना डेमोक्रसी पार्टीचे अध्यक्ष वांगजुन शी यांनी नुकताच सोशल मीडियावर एक मोठा गौप्यस्फोट केला. किम जोंग उनला ब्रेन हॅमरेजचा तीव्र झटका आला आणि तो कोमात गेल्याचा दावा त्यांनी केला. उत्तर कोरियामध्ये पुरेशा वैद्यकीय सुविधा नसल्याने अधिकाऱ्यांनी बीजिंगच्या पेकिंग युनियन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधून तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमला पाचारण केलं. त्यानंतर तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी किम याला बीजिंगला नेण्यात आलं. पण उपचाराची वेळ निघून गेल्याने किमने शस्त्रक्रियेला कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि त्याचा मृत्यू झाला, असा दावा वांगजुन शी यांनी केला आहे.
अधिकाऱ्यांनी किमचा मृतदेह अत्यंत गुप्तपणे उत्तर कोरियात परत आणल्याचा आरोपही शी यांनी केला आहे. देशात घबराट आणि तणाव निर्माण होऊ नये म्हणून सरकार ही अधिकृत घोषणा जाणीवपूर्वक टाळत असल्याचं बोललं जात आहे.
किम जोंग उनच्या कथित मृत्यूनंतर, त्याची बहीण किम यो जोंग हिने त्याची मुलगी किम जू ए हिला बाजूला सारून देशाची संपूर्ण सत्ता आपल्या हाती घेतल्याचं रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. लष्करावर आपली पकड सिद्ध करण्यासाठी किम यो जोंगने दक्षिण कोरियाविरुद्ध अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्याची चर्चा आहे.
दक्षिण कोरियाच्या सीमेवर लाऊडस्पीकरवरून अपप्रचार करणं, वॉर्निंग शॉट्स फायर करणं आणि टॅक्टिकल स्ट्राईक सिस्टीम अपग्रेड करणं, या माध्यमातून ती आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
चीनने प्योंगयांगमध्ये सुमारे ९००० सैनिक पाठवल्याचा धक्कादायक दावाही वांगजुन शी यांनी केला आहे. उत्तर कोरियामध्ये यादवी युद्ध किंवा सत्तेसाठी सशस्त्र संघर्ष उफाळून येण्याच्या भीतीने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी चीनने हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीची नॉर्दर्न थिएटर कमांड सध्या 'लेव्हल-३' हाय अलर्टवर आहे. अधिकाऱ्यांनी लष्करी तळांवरून जवानांच्या हालचालींवर कडक निर्बंध लादले आहेत.
उत्तर कोरियाच्या घडामोडींसोबतच वांगजुन शी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबतही मोठे दावे केले आहेत. भारतात झालेल्या ब्रिक्स परिषदेदरम्यान जिनपिंग यांना स्ट्रोक आल्याचा आरोप त्यांनी केला. बीजिंगला परतल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर कार्डिओव्हॅस्क्युलर शस्त्रक्रिया केल्याचं म्हटलं जातंय. किम जोंग उन आणि शी जिनपिंग या दोघांनाही एकाच प्रकारच्या आरोग्य समस्यांचा सामना करावा लागल्याचा दावा शी यांनी केला आहे.
या सर्व भयंकर अफवा आणि दाव्यांनंतरही, किम जोंग उनचा मृत्यू किंवा चिनी लष्कराच्या तैनातीबाबत अद्याप कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नाही. उत्तर कोरियाच्या सरकारी मीडियाने नुकतेच किम जोंग उनचे ताजे फोटो प्रसिद्ध केले आहेत. या फोटोंमध्ये तो आपली पत्नी री सोल जू आणि मुलगी किम जू ए यांच्यासोबत एका राष्ट्रीय कपडे आणि पादत्राणांच्या प्रदर्शनाला उपस्थित असल्याचं दिसत आहे.
किम अजूनही सक्रिय असल्याचं दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थांनी स्पष्ट केलं आहे. उत्तर कोरिया हा जगातील सर्वात गुप्त देशांपैकी एक आहे, त्यामुळे अशा अफवा पसरणं ही काही नवीन गोष्ट नाही. तरीही, संपूर्ण जग या ताज्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.