
केरळच्या तरुणांचं गाड्यांवरचं प्रेम आणि त्यांची क्रेझ अनेकदा भन्नाट गोष्टी घडवून आणते. अशाच एका साहसी प्रवासाची गोष्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जॉन नावाच्या एका कार प्रेमीने लग्नात गिफ्ट मिळालेली ५७ वर्ष जुनी 'लँड रोव्हर सिरीज IIA' (Land Rover Series IIA) मॉडिफाय केली. आणि याच गाडीतून त्याने पत्नीसोबत यूके ते इटली असा तब्बल ३,००० किलोमीटरचा प्रवास केला.
युरोपमध्ये रोड ट्रिपला जाण्याचं अनेकांचं स्वप्न असतं, पण जॉनचा प्लॅन जरा हटके होता, असं त्याची पत्नी एल्सा अरिगोनी सांगते. जॉनने त्याच्या भावासोबत मिळून ही पाच दशकांहून जुनी लँड रोव्हर पूर्णपणे उघडून तिचा एक-एक पार्ट नव्याने जोडला. काम पूर्ण झाल्यावर जॉनच्या लहान भावाने हीच गाडी या दोघांना लग्नाचं गिफ्ट म्हणून दिली. इथूनच या प्रेमाच्या आणि गाडीच्या वेडाच्या प्रवासाला सुरुवात झाली.
यूकेवरून इटलीला जाणारा हा ३,००० किलोमीटरचा टप्पा पार करणं हे त्यांचं टार्गेट होतं. पण ५७ वर्ष जुन्या गाडीने या प्रवासात त्यांची चांगलीच परीक्षा पाहिली. गाडी वाटेत अनेकदा बंद पडली. पण प्रत्येक वेळी प्रवास थांबवण्याऐवजी जॉनने सोबत आणलेल्या टूल्सच्या मदतीने गाडीतील बिघाड शोधला, ती दुरुस्त केली आणि तो पुढे जात राहिला.
नवीन ठिकाणांना भेटी देणं, अनोळखी लोकांना भेटणं आणि रस्त्याच्या कडेला गाडी दुरुस्त करत पुढे जाणं, हा प्रवास अपेक्षेपेक्षा खूपच साहसी ठरला, असं एल्साने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. दर काहीशे किलोमीटरनंतर आता गाडीत काय बिघाड होईल, याची तिला भीती वाटायची. पण गाडी बंद पडली म्हणजे प्रवास संपला असं जॉन किंवा केरळच्या कार प्रेमींना वाटत नाही. ते गाडी दुरुस्त करतात आणि पुन्हा प्रवासाला लागतात, असंही तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय. पुन्हा अशा प्रवासाला जाणार का? या प्रश्नावर एल्सा गमतीने म्हणते, "पुढच्या वेळी गाडी कुठे बंद पडणार आहे, हे समजल्यावरच मला हा प्रश्न विचारा." ५७ वर्ष जुन्या लँड रोव्हरमधून ३,००० किलोमीटरचा प्रवास करायला तुम्हाला आवडेल का? असा प्रश्न विचारत एल्साने तिची पोस्ट संपवली आहे.