Khamenei Assassination : खमेनींचा माग काढायला इस्रायलने तेहरानचे ट्रॅफिक कॅमेरेच केले होते हॅक!

Published : Mar 04, 2026, 08:23 AM IST
Israel Hacked Tehran Traffic Cameras

सार

Israel Hacked Tehran Traffic Cameras : इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी थेट राजधानी तेहरानमधील ट्रॅफिक कॅमेरेच हॅक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Israel Hacked Tehran Traffic Cameras : शत्रूंवर हल्ला करण्यासाठी आणि हेरगिरीसाठी जगात प्रसिद्ध असलेल्या इस्रायलने एक मोठी खेळी खेळली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचा माग काढण्यासाठी इस्रायलने थेट इराणची राजधानी तेहरानमधील ट्रॅफिक कॅमेरेच हॅक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या शनिवारी इराणवर हल्ला करण्यापूर्वी, इस्रायलने 'बडा साब' नावाचं एक मोबाईल ॲप हॅक करून शिया मुस्लिमांनाच सरकारविरोधात भडकवण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असतानाच, इस्रायलच्या आणखी एका सायबर हल्ल्याने जगाला धक्का दिला आहे. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एका वृत्तपत्राने हा खळबळजनक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. यानुसार, मोसादने गेल्या एक वर्षापासून तेहरानमधील ट्रॅफिक कॅमेरे हॅक करून खमेनींचे बॉडीगार्ड्स आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली होती.

डाव असा उलटला:

गंमत म्हणजे, इराण सरकारने आपल्या विरोधकांना आणि आंदोलकांना ओळखण्यासाठी देशभरात पाळत ठेवणारे कॅमेरे बसवले होते. याच कॅमेऱ्यांचा वापर करून अलीकडेच इराणमध्ये झालेली आंदोलनं चिरडून टाकण्यात आली होती. पण आता इस्रायलने नेमके तेच कॅमेरे वापरून इराणच्या मोठ्या अधिकाऱ्यांवर पाळत ठेवली.

रिपोर्टनुसार, इस्रायलने गेल्या वर्षीच या कॅमेऱ्यांवर नियंत्रण मिळवलं होतं. यापैकी एक कॅमेरा तर खमेनींच्या सुरक्षा टीमच्या गाड्यांच्या पार्किंगच्या ठिकाणी लावलेला होता. या कॅमेऱ्याच्या मदतीने मोसाद गेल्या वर्षभरापासून खमेनींच्या सुरक्षा रक्षकांची माहिती, त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, हे सगळं गुपचूपपणे गोळा करत होती. सुरक्षा कर्मचारी ऑफिसजवळ जास्त संख्येने दिसले की खमेनी तिथेच आहेत, असा अंदाज बांधण्याची ही एक युक्ती होती.

हल्ल्याच्या दिवशी, म्हणजे गेल्या शनिवारी, इस्रायल आणि अमेरिकेने मिळून तेहरानच्या पाश्चर स्ट्रीटवरील मोबाईल नेटवर्क जाम केलं होतं. जेणेकरून हल्ल्याची थोडी जरी माहिती बाहेर फुटली, तरी ती खमेनींच्या बॉडीगार्ड्सपर्यंत पोहोचू नये, याची काळजी घेण्यात आली होती, असं सूत्रांनी सांगितलं.

इराणच्या नेत्यांच्या रोजच्या हालचालींवरून गोळा केलेल्या माहितीचं विश्लेषण करण्यासाठी AI टूल्स आणि अल्गोरिदमचा वापर करण्यात आला. त्यानंतरच हत्येचा संपूर्ण कट रचण्यात आला होता, असंही म्हटलं जात आहे.

दात आणि पोटात चिप बसवली होती का?

ट्रॅफिक कॅमेरे हॅक केल्याच्या बातमीनंतर आता सोशल मीडियावर एक वेगळीच कहाणी व्हायरल होत आहे. त्यानुसार, इराणच्या एका लष्करी अधिकाऱ्याच्या दात आणि पोटात चिप बसवून खमेनी कुठे लपले आहेत, याचा शोध घेण्यात आला.

काही वर्षांपूर्वी मोसादचे एजंट डॉक्टर आणि डेंटिस्ट बनून इराणमध्ये घुसले होते. अशाच एका डेंटिस्टने इराणच्या एका मोठ्या लष्करी अधिकाऱ्याच्या दातात चिप बसवली होती, असं म्हटलं जातं.

तर काही जणांच्या मते, एका गॅस्ट्रो डॉक्टरने लष्करी अधिकाऱ्याच्या पोटात अशीच चिप बसवली आणि त्याद्वारे खमेनी आणि त्यांच्या कुटुंबाच्या लपण्याच्या जागेचा शोध घेतला.

इराणचा कमांडर खानी हाच अमेरिका-इस्रायलचा गुप्तहेर?

आता तर काही लोक इराणच्या IRGC चे कमांडर इस्माईल खानी यांच्यावरच गंभीर आरोप करत आहेत. खानी हे मोसाद आणि अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA चे एजंट असल्याचा काहींचा दावा आहे. इस्रायलच्या हल्ल्यातून ते कोणत्याही धोक्याशिवाय वाचले आणि हल्ल्याच्या काही मिनिटं आधीच ते खमेनींच्या घरातून बाहेर पडले होते, असं कारण या दाव्यासाठी दिलं जात आहे. काही रिपोर्ट्सनुसार, खानी यांना अटक होण्याचीही शक्यता आहे. मात्र, या कहाण्यांना अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही.

इस्रायलने नेमकं काय केलं?

1. सरकारविरोधी आंदोलकांना ओळखण्यासाठी इराणने देशभरात ट्रॅफिक सिग्नलवर कॅमेरे बसवले होते.

2. इस्रायलने नेमके तेच कॅमेरे हॅक केले. एक कॅमेरा तर खमेनींच्या सुरक्षा रक्षकांच्या पार्किंगमध्ये होता.

3. या कॅमेऱ्यातून खमेनींच्या सुरक्षा टीममध्ये कोण-कोण आहे, त्यांची पार्श्वभूमी आणि हालचालींची माहिती गोळा केली.

4. सुरक्षा रक्षक जास्त असतील तर खमेनी तिथेच आहेत, हे ओळखण्याची ही एक युक्ती होती.

5. गेल्या शनिवारी हल्ल्यापूर्वी, खमेनींच्या ऑफिसजवळचं मोबाईल नेटवर्क जाम करण्यात आलं, जेणेकरून कोणतीही माहिती बाहेर फुटू नये.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Iran-Israel War : इस्रायलचा इराणच्या 2 मोठ्या विमानतळांवर हल्ला, बुशेहर अणुप्रकल्पाचे टेन्शन वाढले!
UAE-Iran Conflict : आम्ही युद्धात नाही! इराणसोबतच्या संघर्षावर UAE ची मोठी घोषणा, पण दिला 'हा' इशारा