
मुंबई : इस्राइलने बुधवारी (16 जुलै) सीरियाची राजधानी दमास्कमधील राष्ट्रपती राजवाड्याजवळ एक मोठा हल्ला केला. इस्राइलच्या मोठ्या हवाई हल्ल्यामध्ये सीरियाच्या सैन्य ताफ्यासह संरक्षण मंत्रालयाच्या इमारतीला निशाण्यावर ठेवण्यात आले होते. हल्ल्यामध्ये संरक्षण मंत्रालयाच्या इमारतीचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय काही सैनिक देखील जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
इस्राइलचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी म्हटले की, सीरियाच्या सरकारने ड्रुझ अल्पसंख्याकांच्या परिस्थितीत हस्तक्षेप करू नये. ते एकटे आहेत असे समजून त्यांच्यावर लष्करी कारवाई करू नये.
आरोग्य मंत्रालयाची माहिती
सीरियाच्या आरोग्य मंत्रालयाने असा दावा केला आहे की, सैन्य आणि संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाला लक्ष्य करुन केलेल्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू तर 18 जण जखमी झाले आहेत.
शासकीय टीव्ही इमारतीवरही हल्ला
बुधवारी रात्री उशिरा मध्य दमास्कमधील सीरियाच्या शासकीय टीव्हीच्या इमारतीवर देखील हवाई हल्ला करण्यात आला. यामुळे थेट प्रक्षेपण सुरू असताना अँकर शो सोडून पळाल्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इस्राइलकडून हल्ले होणार
दरम्यान, इस्रायल ड्रुझ लोकसंख्येला लक्ष्य करण्याच्या विरोधात आहे. जर सीरियन सैन्याने ड्रुझ लोकसंख्येविरुद्धच्या कारवाया थांबवल्या नाहीत तर इस्रायल हल्ले करत राहील.
169 जणांच्या मृत्यूची शक्यता
सीरियामध्ये पाच लाख ड्रुझ नागरिक राहतात. संपूर्ण जगामध्ये त्यांची लोकसंख्या दहा लाखच्या आसपास आहे. सीरियाच्या स्वेदा आणि बेदोइन शहरात ड्रुझ यांची मोठी लोकसंख्या आहे. येथे गेल्या काही दिवसांपासून, सीरियन सरकारी सैन्य टँक आणि जड शस्त्रे वापरून त्यांच्यावर कारवाई करत आहे; यामध्ये 169 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
शासकीय सैन्याकडून टँक निशाण्यावर
सोमवारी, इस्रायलने तेथे झालेल्या लढाईत सहभागी असलेल्या सीरियन सरकारी दलांच्या टँकना लक्ष्य केले. बुधवारी झालेल्या हल्ल्यानंतर, इस्रायली लष्कराने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "सीरियन सरकारच्या लष्करी मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लक्ष्य करून एक संदेश पाठवण्यात आला."
कारवाईला प्रत्युत्तर देण्याची मागणी
इस्रायलमध्ये राहणाऱ्या ड्रुझ समुदायाच्या लोकांनी त्यांच्या समुदायाच्या लोकांना पाठिंबा देण्यासाठी सीरियाच्या सीमेवर पोहोचून सीरिया सरकारच्या कारवाईला प्रत्युत्तर देण्याची मागणी केली. तसेच बशर अल-असद यांच्या राजवटीत इस्रायलने सीरियामध्ये वारंवार हवाई हल्ले केले होते.