
Israel Accused of Using White Phosphorus : मध्य पूर्वेत युद्धामुळे आधीच तणाव असताना, इस्रायलने लेबनॉनमधील घरांवर व्हाईट फॉस्फरसचा बेकायदेशीरपणे वापर केल्याचा गंभीर आरोप 'ह्युमन राइट्स वॉच' या संस्थेने सोमवारी केला आहे. व्हाईट फॉस्फरस हे एक असं रसायन आहे, जे नागरिकांवर अत्यंत भयंकर परिणाम करू शकतं.
ह्युमन राइट्स वॉचने हल्ल्याच्या फोटोंच्या आधारे म्हटलं आहे की, 'इस्रायली सैन्याने ३ मार्च रोजी दक्षिण लेबनॉनमधील योह्मोर (Yohmor) शहरात घरांवर हवेत फुटणाऱ्या व्हाईट फॉस्फरसचे २ तोफगोळे डागले. यामुळे किमान २ घरांना आणि एका कारला आग लागली. ही एक अत्यंत चिंताजनक घटना असून, यामुळे नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.'
हा एक रासायनिक पदार्थ आहे, जो तोफगोळे, बॉम्ब आणि रॉकेटमध्ये वापरला जातो. ऑक्सिजनच्या संपर्कात येताच तो पेट घेतो. यामुळे घरं, शेतजमीन आणि इतर नागरी वस्त्यांमध्ये आग लागू शकते. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, जास्त लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये हवेत फुटणाऱ्या व्हाईट फॉस्फरसच्या वापरावर बंदी आहे.
दोन वर्षांपूर्वीही ह्युमन राइट्स वॉचने इस्रायलवर गाझा आणि लेबनॉनमध्ये व्हाईट फॉस्फरस वापरल्याचा आरोप केला होता. त्यावेळी इस्रायलने हे आरोप फेटाळून लावले होते.