इराणच्या विमान वाहतूक इतिहासात प्रथमच पूर्णपणे महिलांनी चालवलेले विमान आकाशात झेपावले आहे.
इराणमध्ये इतिहास घडवत पहिले महिला विमान यशस्वीरित्या उतरले आहे. 'इराण बानू' (इराण लेडी) असे नाव असलेले असेमान एअरलाइन्सचे हे विमान इराणमधील मशाद येथील हाशेमीनेजाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. यामुळे इराणच्या विमान वाहतूक इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.
इराणच्या पहिल्या महिला वैमानिक कॅप्टन शाह रझाद शम्स यांनी हे विमान उडवले. विमानात ११० महिला प्रवासी होत्या. इराणच्या विमान वाहतूक इतिहासात प्रथमच महिला प्रवासी आणि कर्मचारी असलेले विमान मशादमध्ये उतरले आहे, असे अधिकृत वृत्तसंस्था आयआरएनएने म्हटले आहे. पैगंबर मोहम्मद आणि त्यांची पत्नी खदीजा यांची मुलगी हजरत फातिमा सहरा यांचा जन्मदिवस २२ डिसेंबर रोजी हे विमान मशादमधील हाशेमीनेजाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. हा दिवस इराणमध्ये मातृदिन आणि महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आठव्या शिया इमाम इमाम रेझा यांच्या थडग्याला भेट देण्यासाठी निघालेल्या विविध क्षेत्रातील महिला या विमानात प्रवास करत होत्या, असे वृत्तात म्हटले आहे.
इराणच्या विमान वाहतूक क्षेत्रात महिला वैमानिकांची संख्या वाढत असली तरी, त्या अजूनही अल्पसंख्य आहेत, असे वृत्तात म्हटले आहे. २०१९ च्या ऑक्टोबरमध्ये इराणमध्ये प्रथमच महिला वैमानिकांनी विमान उडवण्यास सुरुवात केली. महिला वैमानिक नेशात जहंदारी आणि सह-वैमानिक फोरूज फिरोझी या देशातील पहिल्या महिला वैमानिक ठरल्या ज्यांनी व्यावसायिक प्रवासी विमान उडवले. तेहरानमधील मेहराबाद विमानतळानंतर मशाद विमानतळ हे इराणमधील दुसरे सर्वात व्यस्त विमानतळ आहे.