Indonesia Earthquake : इंडोनेशियाला 7.7 तीव्रतेच्या भूकंपाचा जोरदार धक्का; त्सुनामीचाही इशारा, अनेक इमारतींचे नुकसान

Published : Aug 15, 2026, 11:34 AM IST
Indonesia Earthquake

सार

इंडोनेशियाच्या फ्लोरेस भागात शनिवारी सकाळी 7.7 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र समुद्रात सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होते. भूकंपानंतर काही किनारी भागांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे.

मुंबई : इंडोनेशियाला शनिवारी सकाळी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फ्लोरेस परिसरातील समुद्रात 7.7 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. या भूकंपाचे हादरे मोठ्या परिसरात जाणवले. तसेच अनेक ठिकाणी घरांचे आणि सार्वजनिक इमारतींचे नुकसान झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. भूकंपानंतर इंडोनेशियाच्या किनारी भागांसाठी त्सुनामीचा इशारा जारी केला आहे.

10 किलोमीटर खोलीवर होते भूकंपाचे केंद्र

अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार (USGS), स्थानिक वेळेनुसार शनिवारी सकाळी 5.58 वाजता फ्लोरेस परिसरात भूकंप झाला. भूकंपाची खोली सुमारे 10 किलोमीटर होती. पूर्व नुसा तेंगारा प्रांतातील एंडे शहरापासून अंदाजे 68 किलोमीटर वायव्य दिशेला समुद्रात भूकंपाचे केंद्र होते. मुख्य भूकंपानंतर परिसरात काही आफ्टरशॉक्सही जाणवले. दरम्यान, इंडोनेशियाच्या हलमहेरा भागातील माउंट इबू ज्वालामुखीतही उद्रेक झाला असून सुमारे पाच किलोमीटर उंचीपर्यंत राखेचे ढग आकाशात पसरल्याचे वृत्त आहे.

किनारी भागांसाठी त्सुनामीचा इशारा

भूकंपानंतर इंडोनेशियाच्या पूर्व नुसा तेंगारा, पश्चिम नुसा तेंगारा, दक्षिण सुलावेसी आणि दक्षिण-पूर्व सुलावेसीमधील काही भागांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना समुद्रकिनारे आणि नदीकाठापासून दूर राहण्याचे तसेच सुरक्षित आणि उंच ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणाऱ्या संभाव्य बदलांवर अधिकारी सतत लक्ष ठेवून आहेत.

फ्लोरेसमध्ये अनेक इमारतींचे नुकसान

भूकंपाचे तीव्र हादरे फ्लोरेस बेटाच्या अनेक भागांत जाणवले. प्राथमिक माहितीनुसार, काही घरांसह सार्वजनिक सुविधांचेही नुकसान झाले आहे. पूर्व नुसा तेंगारा प्रांतातील सिक्का भागातील रहिवासी योहाना एम्बू यांनी भूकंपानंतर नागरिक घाबरून उंच ठिकाणांकडे धावले. याशिवाय अनेक इमारतींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. तर मौमेरे बंदरातील टर्मिनलच्या प्रतीक्षालयाचा काही भाग कोसळल्याचे वृत्त आहे.

चर्च आणि सेमिनरीमध्येही भीतीचे वातावरण

सिक्का येथील सेंट पीटर मेजर सेमिनरीमध्ये सकाळच्या प्रार्थनेदरम्यान भूकंपाचे हादरे जाणवले. सेमिनरीचे रेक्टर रेव्ह गिडेलबर्टस टांगा यांच्या माहितीनुसार, भूकंपाच्या वेळी विद्यार्थी आणि नन्स प्रार्थनेसाठी उपस्थित होते. भूकंपाच्या हादऱ्यांमुळे प्रार्थना सभागृहाच्या छताचा काही भाग कोसळला. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी एका धर्मगुरूंनी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाल्याचे समोर आले आहे.

बचावकार्य आणि परिस्थितीचा आढावा सुरू

भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्याचे काम सुरू आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र, आफ्टरशॉक्स आणि त्सुनामीच्या संभाव्य धोक्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

AI E-Waste : एआयच्या वेगामुळे जगात ई-कचऱ्याचा डोंगर उभा राहणार
China Parking Dispute : चिनी महिलेने स्वस्तात खरेदी केले 196 पार्किंग स्पॉट्स, आता 80% नफ्याने विकतेय