
Indian Man Vikrant Thakur Pleads Guilty : ऑस्ट्रेलियातील ॲडलेडमध्ये पत्नी सुप्रिया ठाकूरच्या हत्येप्रकरणी पती विक्रांत ठाकूरने गुन्हा कबूल केला आहे. मात्र, आपण केलेला गुन्हा हत्या नसून सदोष मनुष्यवध आहे, असा युक्तिवाद त्याने ॲडलेड मॅजिस्ट्रेट कोर्टात केला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये परदेशी भारतीयांना हादरवून सोडणारी ही घटना घडली होती. १४ जानेवारी रोजी दुसऱ्यांदा कोर्टात हजर केले असता विक्रांतने आपली भूमिका स्पष्ट केली.
वकिलांच्या सल्ल्यानुसार मी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कबूल करत आहे, पण मी हत्येसाठी दोषी नाही, असे विक्रांतने कोर्टात सांगितले. जाणूनबुजून जीव घेणे याला हत्या मानले जाते. पण एखाद्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरले तरी, ते जाणूनबुजून केलेले नसल्यास त्याला सदोष मनुष्यवध मानले जाते. शिक्षेच्या कालावधीत यात मोठा फरक असतो, असा विक्रांतचा युक्तिवाद होता.
२१ डिसेंबर रोजी ॲडलेडच्या उत्तरेकडील उपनगरातील घरात कौटुंबिक हिंसाचार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. घरी पोहोचल्यावर सुप्रिया बेशुद्धावस्थेत आढळली. सीपीआर देऊनही तिचा जीव वाचवता आला नाही. त्यानंतर पोलिसांनी विक्रांतला अटक केली. डीएनए चाचणी आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी कोर्टाने ही सुनावणी एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.
नोंदणीकृत नर्स म्हणून काम करून मुलाला चांगले भविष्य देण्याच्या इच्छेने सुप्रिया ऑस्ट्रेलियाला आली होती. सुप्रियाच्या निधनाने तिचा एकुलता एक मुलगा अनाथ झाला आहे. मुलाच्या संगोपनासाठी मित्र आणि प्रवासी संघटनांनी मिळून निधी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. सुप्रियाने सर्व काही आपल्या मुलासाठी केले होते. तिच्या मृत्यूने त्या लहान मुलाचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे, असे तिच्या मित्रांनी GoFundMe पेजवर लिहिले आहे.