
कराची: पाकिस्तानातील कराची शहरातील एका शॉपिंग मॉलला लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गुल प्लाझा शॉपिंग मॉलमध्ये शनिवारी रात्री दहा वाजता ही दुर्घटना घडली. तळमजल्यावर लागलेली आग वेगाने वरच्या मजल्यांवर पसरली.
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तातडीने दाखल झाले, मात्र कालपर्यंत आग पूर्णपणे विझवता आली नाही. प्रचंड उष्णतेमुळे इमारतीचे काही भाग कोसळले. इमारतीची रचना कमकुवत झाल्याचा अंदाज आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
इमारतीचे काही भाग कोसळल्याने बेपत्ता असलेल्या 65 हून अधिक लोकांचा कराची अग्निशमन दलाचे जवान शोध घेत आहेत. ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का, याची तपासणी केली जात आहे. 24 तासांहून अधिक वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या मॉलमध्ये 1,200 हून अधिक दुकाने असून, हवा खेळती नसल्याने संपूर्ण इमारत धुराने भरली आणि बचावकार्यात अडथळा निर्माण झाला. '20 वर्षांची मेहनत वाया गेली,' असे एका दुकान मालक यास्मिन बानो यांनी सांगितले. सिंध पोलीस प्रमुख जावेद आलम ओधो यांनी शॉर्ट सर्किटचा संशय व्यक्त केला आहे. दुर्घटनेनंतर 23 तासांनी घटनास्थळी पोहोचलेल्या महापौरांविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला.