
मुंबई: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि समाजप्रवर्तक हर्ष गोयंका यांनी पुन्हा एकदा आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आले आहेत. तुर्किये आणि अझरबैजान या देशांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ उघड भूमिका घेतल्यानंतर, त्यांनी भारतीय पर्यटकांना या देशांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
हर्ष गोयंका यांनी एक्स (Twitter) वर पोस्ट करत म्हटलं, "भारतीय पर्यटकांनी मागील वर्षी तुर्किये आणि अझरबैजानला पर्यटनाच्या माध्यमातून तब्बल ४,००० कोटी रुपयांचा व्यवसाय मिळवून दिला. त्यातून त्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली, रोजगार निर्माण झाला आणि पर्यटन क्षेत्र फुललं. मात्र, आज हेच देश पाकिस्तानच्या बाजूने उभे राहतात!" त्यांनी पुढे स्पष्टपणे सांगितले की, "आपण आता आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. जे राष्ट्र आपल्याच्या शत्रूला मदत करत आहेत, त्यांच्या अर्थव्यवस्थेला आपण बळकट का करावं?"
हर्ष गोयंका यांच्या या संतप्त प्रतिक्रियेनंतर अनेक भारतीय पर्यटन कंपन्यांनी या आवाहनाला पाठिंबा दर्शवला आहे. Ixigo, Cox & Kings, EaseMyTrip आणि Go Homestays या कंपन्यांनी तुर्किये, अझरबैजान आणि चीनमधील सर्व हॉटेल व विमान बुकिंग रद्द केल्याचे जाहीर केले आहे. Ixigo ने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, "भारतावरील प्रेमापुढे व्यवसाय गौण आहे. जय हिंद!"
हर्ष गोयंका यांची ही भूमिका केवळ भावनात्मक प्रतिक्रिया नाही, तर राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणारी ठाम भूमिका आहे. पर्यटकांना आवाहन करताना त्यांनी सांगितलं. "भारत आणि जगात सुंदर पर्यटनस्थळांची कमी नाही. मग अशा राष्ट्रांत का जावं, जे आपल्यावर शस्त्र उगारणाऱ्या देशांच्या पाठीशी उभे राहतात?"
‘टूरिझम विथ पॅट्रिओटिझम’ हे सूत्र आता अधिक ठामपणे पुढे येत आहे. भारताच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या देशांना आर्थिक पाठिंबा न देण्याचा विचार अनेक भारतीय नागरिक व संस्था करत आहेत. हर्ष गोयंका यांची ही पोस्ट हा त्याच दिशेने टाकलेला ठाम पाऊल आहे.