Germany fire : भारतीय विद्यार्थ्याचा करूण अंत; आग लागल्याने इमारतीतून मारली उडी

Published : Jan 02, 2026, 02:21 PM IST
Germany fire

सार

Germany fire : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान जर्मनीतील एका अपार्टमेंटला आग लागली. या आगीतून वाचण्यासाठी तेलंगणाच्या हृतिक रेड्डी या भारतीय विद्यार्थ्याचा इमारतीतून उडी मारली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. 

(Germany Fire) बर्लिन : जगभरात 31 डिसेंबर 2025 च्या मध्यरात्री मावळत्या वर्षाला निरोप देत नव्या 2026 वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. मध्यरात्रीचे 12 वाजताच सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी झाली. पण जर्मनीतल्या एका दुर्घटनेमुळे भारतातल्या तेलंगणामधील एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. नव्या वर्षाच्या स्वागताच्या उत्साहाला या घटनेमुळे गालबोट लागले. न्यू ईयर सेलिब्रेशनदरम्यान एका इमारतीला लागलेल्या आगीचे निमित्त ठरले.

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान जर्मनीमध्ये लागलेल्या आगीतून वाचण्याच्या प्रयत्नात तेलंगणाचा रहिवासी असलेल्या हृतिक रेड्डी (25) याचा दुर्दैवी अंत झाला. आग पसरत असल्याचे पाहून घाबरलेल्या हृतिकने अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावरून खाली उडी मारली. हृतिक रेड्डी संक्रांतीच्या सणासाठी भारतात येणार होता. मोठ्या आशेने वाट पाहणाऱ्या कुटुंबीयांसमोर आता हृतिकचे केवळ पार्थिव येणार आहे.

ही दुर्घटना नवीन वर्षाच्या दिवशी घडली. हृतिक राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये आग लागल्यानंतर दाट धूर पसरू लागला. आपला जीव वाचवण्यासाठी हृतिकने वरच्या मजल्यावरून उडी मारली. खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

2022 मध्ये वाग्देवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून पदवी घेतल्यानंतर हृतिक जर्मनीला गेला होता. एमएस पदवी मिळवण्यासाठी हृतिक रेड्डी जून 2023 मध्ये जर्मनीतील मॅग्डेबर्ग येथे पोहोचला. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात संक्रांतीच्या सणासाठी तो घरी येणार होता, त्याचवेळी ही दुर्दैवी घटना घडली.

आगीच्या कारणाचा तपास अधिकारी करत आहेत. तेलंगणातील हृतिकच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी परराष्ट्र मंत्रालय आणि जर्मनीतील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मूळ गावी आणण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Indian language : या 7 देशांमध्ये बोलली जाते हिंदी! तुम्हाला याची माहिती आहे का?
600 किलो वजन... 400 किलो कमी करून जिंकला, पण शेवटी आयुष्यालाच मुकला!