
New York Mayor Zohran Mamdani Supports Jailed Activist Umar Khalid : अमेरिकेतील सर्वात मोठे शहर न्यूयॉर्कचे महापौर म्हणून शपथ घेतल्यानंतर, झोरान मामदानी यांनी भारतीय कार्यकर्ते उमर खालिदला पाठिंबा जाहीर केला आहे. दिल्लीतील तिहार तुरुंगात UAPA अंतर्गत कैद असलेले माजी JNU विद्यार्थी उमर खालिद यांना मामदानी यांनी पाठवलेले पत्र नुकतेच समोर आले आहे. न्यूयॉर्कचे नेतृत्व करणारे पहिले मुस्लिम आणि भारतीय वंशाचे व्यक्ती असलेल्या मामदानी यांनी आपल्या कारकिर्दीच्या महत्त्वाच्या दिवशीच अशी भूमिका घेतल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर याची दखल घेतली जात आहे. उमर खालिदच्या आई-वडिलांना भेटल्यानंतर मामदानी यांनी हे पत्र लिहिले आहे.
‘वाईट अनुभवांना स्वतःवर पूर्णपणे हावी होऊ देऊ नये’ हे उमर खालिदचे शब्द आपल्याला नेहमी आठवतात, असे मामदानी यांनी पत्रात लिहिले आहे. उमरच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला आणि आम्ही सर्वजण त्याचा विचार करत आहोत, असेही पत्रात म्हटले आहे. यापूर्वी न्यूयॉर्क स्टेट असेंब्लीचे सदस्य असतानाही मामदानी यांनी उमर खालिदच्या वाढत्या तुरुंगवासाविरोधात जाहीरपणे आवाज उठवला होता.
2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी एका कार्यक्रमात, त्यांनी सुनावणीशिवाय एक हजार दिवसांहून अधिक काळ तुरुंगात असलेल्या उमर खालिदचे लिखाण वाचले होते. द्वेष आणि मॉब लिंचिंगविरोधात बोलणाऱ्या तरुणाला सुनावणीशिवाय तुरुंगात ठेवणे हे लोकशाहीला शोभणारे नाही, अशी भूमिका मामदानी यांनी त्यावेळी घेतली होती.
याच विषयावर आठ अमेरिकन खासदारांनी वॉशिंग्टनमधील भारतीय राजदूतांना पत्र लिहिल्यानंतर आता न्यूयॉर्कच्या महापौरांनीही यात हस्तक्षेप केला आहे. सप्टेंबर 2020 मध्ये अटक झालेल्या उमर खालिदला दिल्ली न्यायालयाने अनेकदा जामीन नाकारला होता. कुटुंबातील लग्नासाठी डिसेंबरच्या मध्यात त्याला काही काळासाठी अंतरिम जामीन मंजूर झाला होता, पण सोशल मीडिया न वापरणे आणि माध्यमांशी न बोलणे असे कठोर निर्बंध घालण्यात आले होते. उमर खालिदच्या अटकेवरून आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू असतानाच अमेरिकेतील एका मोठ्या राजकीय नेत्याचे हे पत्र समोर आले आहे.