
German Family Of Four Dies In Turkey : तुर्कीमध्ये सुट्टी साजरी करत असताना अन्न विषबाधेमुळे एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. इस्तंबूलच्या ओर्टाकोय जिल्ह्यातील बोस्फोरसमधील प्रसिद्ध स्ट्रीट फूड खाल्ल्यानंतर तुर्की-जर्मन महिला, तिचा पती आणि त्यांच्या दोन मुलांची प्रकृती गंभीर झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. हे कुटुंब सुट्टी साजरी करण्यासाठी जर्मनीहून आले होते. बुधवारी चौघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहा वर्षांचा कादिर आणि तीन वर्षांची मसाल यांचा गुरुवारी मृत्यू झाला. आई सिगडेम बोसेकचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. वडील सेर्वेट बोसेक यांचाही सोमवारी मृत्यू झाला.
सीएनएन तुर्कच्या वृत्तानुसार, बोसेक कुटुंब ९ नोव्हेंबर रोजी सुट्टी साजरी करण्यासाठी जर्मनीच्या हॅम्बर्ग शहरातून इस्तंबूलला पोहोचले. प्रवासादरम्यान, त्यांनी रस्त्यावरील स्टॉलवरून भातासोबत शिंपले, टॉपिंग्जने भरलेला उकडलेला बटाटा आणि 'कोकोरेक' नावाचा ग्रील्ड मटणाचा एक पदार्थ खाल्ला होता, असे म्हटले जात आहे.
त्यानंतर लगेचच दोन्ही मुलांना मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. पालकांमध्येही अशीच लक्षणे दिसू लागली. हुरियत डेली न्यूजच्या वृत्तानुसार, १२ नोव्हेंबर रोजी कुटुंबाने रुग्णालय गाठले, पण त्याच दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तीव्र ताप आणि उलट्यांमुळे आई आणि मुलांना पुन्हा रुग्णालयात आणण्यात आले, परंतु १३ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, बोसेक कुटुंब ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, तिथे ढेकूण मारण्यासाठी कीटकनाशकांचा वापर केला गेला असावा, असेही वृत्त समोर आले आहे.
ॲल्युमिनियम फॉस्फाईडसारख्या कीटकनाशकाची फवारणी केल्याचा संशय आहे. कीटकनाशकाचा वायू व्हेंटिलेशन शाफ्टमधून त्यांच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत पोहोचला असावा, असेही म्हटले जात आहे. १५ नोव्हेंबर रोजी हार्बर सूट्स ओल्ड सिटी हॉटेलमध्ये आणखी दोन पर्यटक आजारी पडल्याचे वृत्त आहे. बेडशीट, उशा, पाण्याच्या बाटल्या आणि ब्लँकेटमधून नमुने गोळा करण्यात आले आहेत. हॉटेल मालक, कर्मचारी आणि कीटक नियंत्रण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह अनेकांची चौकशी सुरू आहे. फॉरेन्सिक मेडिसिन इन्स्टिट्यूटच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.