
मायक्रोसॉफ्टच्या एका माजी महिला अधिकाऱ्याचा मृतदेह ६ मार्च रोजी पाण्यात बुडालेल्या अवस्थेत सापडला होता. आता ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं स्पष्ट झालं आहे. ४४ वर्षीय जेनिफर सायमंड्स असं या महिलेचं नाव असून, त्या मायक्रोसॉफ्टमध्ये सिनिअर कस्टमर सक्सेस अकाउंट मॅनेजर होत्या. इंग्लंडमधील हेनली गावाजवळून वाहणाऱ्या थेम्स नदीत त्यांचा मृतदेह सापडला. थेम्स व्हॅली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ४४ वर्षीय नेलिओ गौविया नावाच्या व्यक्तीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत्यूच्या काही तास आधी जेनिफर सायमंड्स एका सुरक्षा कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या. गेल्या गुरुवारी रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी त्या एका पुरुष मित्रासोबत रेस्टॉरंटमध्ये जाताना दिसल्या. पण रेस्टॉरंट बंद झाल्याचं तिथल्या कर्मचाऱ्याने त्यांना सांगितलं. यानंतर सायमंड्स एका बिस्ट्रोमध्ये गेल्या. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह फिलिस कोर्ट क्लबच्या परिसरात, थेम्स नदीच्या काठावर सापडला. हे क्लब त्या रेस्टॉरंटपासून सुमारे पाऊण किलोमीटर अंतरावर आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.
पोलिसांनी या प्रकरणी फिलिस कोर्ट क्लबमध्ये किचन पोर्टर (किचनमधील मदतनीस) म्हणून काम करणाऱ्या नेलिओ गौवियाला अटक केली आहे. जेनिफर सायमंड्स यांच्या हत्येत त्याचा हात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने जेनिफर यांचा पाठलाग केला आणि त्यांना पाण्यात बुडवून मारलं. जेनिफर मायक्रोसॉफ्टमध्ये सिनिअर कस्टमर सक्सेस अकाउंट मॅनेजर होत्या. जानेवारी २०२५ मध्ये त्यांना मायक्रोसॉफ्टमधून कामावरून कमी करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्या नवीन नोकरीच्या शोधात होत्या. मात्र, त्यांना मनासारखी नोकरी मिळत नव्हती, असं त्यांच्या मित्रांनी सांगितलं.