
Flying Car Accident : शहरी भागातील वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून फ्लाइंग कारची चाचणी सुरू आहे. काही देशांमध्ये फ्लाइंग कारने सेवा सुरू केली आहे. आता पहिल्यांदाच फ्लाइंग कारच्या अपघाताची नोंद झाली आहे. दोन फ्लाइंग कार आकाशात एकमेकांना धडकल्या. त्यानंतर लगेच आग लागून त्या जमिनीवर कोसळल्या. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चीनमधील चांगचुन एअर शोमध्ये ही घटना घडली आहे. एक्सपेंग एरो एचटी (Xpeng AeroHT) कंपनीच्या फ्लाइंग कारला अपघात झाला. एअर शोमध्ये उड्डाणाचे प्रात्यक्षिक सुरू असताना हा अपघात झाला. एअर शो पाहण्यासाठी हजारो लोक जमले होते. त्यामुळे फ्लाइंग कारला ठराविक ठिकाणीच प्रात्यक्षिक सादर करायचे होते. जागेच्या कमतरतेमुळे आकाशात फ्लाइंग कारचा अपघात झाला.
फ्लाइंग कार आकाशात एकमेकांना धडकल्या. धडकेनंतर लगेच आग लागली. लोक ओरडू लागले. अपघातानंतर कारवरील नियंत्रण सुटले. त्यातच फ्लाइंग कारला आग लागली होती. काही मिनिटांतच फ्लाइंग कार जमिनीवर कोसळली. घटनास्थळी अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल झाली. अग्निशमन दलाने आग विझवण्याचे काम सुरू केले, तर जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. चीन सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तब्बल $300,000 किमतीच्या या फ्लाइंग कारच्या अपघातामुळे आता सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरी भागातील वाहतूक समस्येवर फ्लाइंग कार हा एक चांगला उपाय असल्याचे म्हटले जाते. पण जसजशा जास्त फ्लाइंग कार उडू लागतील, तसतसे एअर ट्रॅफिक कंट्रोलची समस्या निर्माण होईल. इतकेच नाही तर विमान उड्डाणातही अडथळा येऊ शकतो. तसेच, नो फ्लाइंग झोनमध्येही फ्लाइंग कार उडण्याची शक्यता आहे. प्रत्येक फ्लाइंग कारवर लक्ष ठेवणे एक आव्हान असेल.
एरो एचटी (AeroHT) कंपनी 2013 मध्ये सुरू झाली. 2018 मध्ये तिने पहिली फ्लाइंग कार विकसित केली. 2024 मध्ये पहिल्यांदाच फ्लाइंग कार एक्सपोमध्ये सादर केली. या कारची विक्रीही सुरु झाली आहे.