
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या प्रमुख गुप्तचर यंत्रणेच्या (एफबीआय) सध्याचे संचालक काश पटेल हे सध्या मोठ्या वादात सापडले आहेत. एका माजी उच्चपदस्थ अधिकाऱ्याने त्यांच्यावर गंभीर आरोप करत, त्यांची कार्यप्रवृत्ती आणि निष्ठा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पटेल हे आपल्या कर्तव्यापेक्षा नाईटक्लबच्या भेटींमध्ये अधिक रस घेत असून, एफबीआय मुख्यालयात त्यांची उपस्थिती अत्यंत मर्यादित असते.
एका वृत्तानुसार, काश पटेल हे अनेकदा उशिरा रात्रीपर्यंत विविध नाईटक्लबमध्ये वेळ घालवताना दिसून येतात. या त्यांच्या सवयीमुळे संघटनेच्या गंभीर आणि संवेदनशील कामकाजावर परिणाम होतो आहे, असा आरोप माजी अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच त्यांच्या मुख्यालयात नियमित गैरहजेरीमुळे एफबीआयच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत खोळंबा येत असल्याची तक्रार आहे.
एफबीआयसारख्या संघटनेचे नेतृत्व करणे हे प्रचंड जबाबदारीचे काम असते. देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेणाऱ्या व्यक्तीने संयम, शिस्त आणि पूर्ण वेळ देणं आवश्यक असताना, संचालकाच्या अश्याप्रकारच्या वागणुकीमुळे संघटनेतील अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोपनीयतेच्या अटीवर ही माहिती दिली आहे की, पटेल यांच्या गैरहजेरीमुळे महत्त्वाच्या बैठका रद्द होतात, किंवा त्यात निर्णय प्रक्रियेचा अडथळा निर्माण होतो.
काश पटेल यांना आधीपासूनच राजकीय वर्तुळात ट्रम्प समर्थक व वादग्रस्त निर्णयांमुळे ओळखले जाते. आता त्यांच्या अशा वागणुकीमुळे विरोधकांना टीकेचे नवे कारण मिळाले असून, एफबीआयच्या स्वायत्ततेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या आरोपांवर काश पटेल यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र, माध्यमांमध्ये हा मुद्दा जोरात गाजत असून, अमेरिकन सुरक्षा व्यवस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.