
मुंबई : युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी आता फ्रान्स, जर्मनी, इटली, पोलंड आणि ब्रिटन हे ५ देश आणि युरोपीय संघाच्या संस्था एकत्र येऊन युरोपचं प्रतिनिधित्व करणार आहेत. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांनी शुक्रवारी (स्थानिक वेळेनुसार) ही घोषणा केली. अमेरिका, युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
अनौपचारिक युरोपियन कौन्सिलच्या पत्रकार परिषदेत कोस्टा यांनी ही माहिती दिली. या चर्चेत युरोपनं एकजुटीनं उभं राहणं किती महत्त्वाचं आहे, यावर युरोपीय नेत्यांनी भर दिला. तसेच, युक्रेनचं हित आणि युरोपची सुरक्षा जपणं ही आपली प्राथमिकता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
'युक्रेनमधील शांतता चर्चेसाठी युरोपीय संघाच्या संस्था आणि फ्रान्स, जर्मनी, इटली, पोलंड व ब्रिटन या ५ देशांची कोएलिशन ऑफ द विलिंग (E5) मिळून युरोपियन टीम बनेल, यावर आज नेत्यांनी सहमती दर्शवली. या चर्चेतील आपली तत्त्वं आणि भूमिका स्पष्ट आहे. आमची युरोपियन टीम संपूर्ण एकजुटीने आणि सर्व सदस्य देशांशी समन्वय साधून काम करेल,' अशी पोस्ट कोस्टा यांनी X वर केली.
युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनीही या राजनैतिक घडामोडींचं स्वागत केलं आहे. कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी युरोपचा सहभाग महत्त्वाचा ठरेल, असं त्या म्हणाल्या. 'न्याय्य आणि कायमस्वरूपी शांततेच्या दिशेनं सुरू असलेल्या या प्रयत्नांचं मी स्वागत करते. युरोपची भक्कम उपस्थिती इथं गरजेची आहे. E5 आणि युरोपीय संघाच्या संस्था मिळून आमची टीम तयार झाली आहे. आम्ही युक्रेन आणि युरोप या दोघांच्याही हिताचं रक्षण करू,' असं त्या म्हणाल्या.