
Volcanic Eruption in Ethiopia: आफ्रिकन देश इथिओपियामध्ये १० हजार वर्षांनंतर झालेल्या भीषण ज्वालामुखीच्या उद्रेकाचा सर्वाधिक परिणाम हवाई वाहतूक क्षेत्रावर झाला आहे. यामुळे २४ नोव्हेंबर रोजी कन्नूरहून अबू धाबीला जाणारे इंडिगोचे विमान 6E 1433 अहमदाबादकडे वळवण्यात आले. इंडिगोचे एअरबस विमान अहमदाबादमध्ये सुरक्षितपणे उतरवण्यात आले. तसेच, प्रवाशांना कन्नूरसाठी परतीची सेवा उपलब्ध करून दिली जाईल, असे इंडिगोने म्हटले आहे.
इथिओपियाच्या हेली गुब्बी ज्वालामुखीमधून निघणारा राखेचा ढग हळूहळू उत्तर भारताकडे सरकण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या भागातून जाणाऱ्या विमान मार्गांसाठी चिंता वाढली आहे. भारतीय हवाई वाहतूक प्राधिकरण आणि एअरलाइन्स सोमवार संध्याकाळपासून दिल्ली आणि जयपूरवरील विमान वाहतुकीवर होणाऱ्या परिणामांवर लक्ष ठेवून आहेत. काही विमानांनी धुरापासून वाचण्यासाठी आधीच आपले मार्ग बदलले आहेत.
अकासा एअरने जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे की, ते आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक नियमांनुसार ज्वालामुखीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. प्रवाशांची सुरक्षा ही त्यांची “सर्वात मोठी प्राथमिकता” आहे.
इथिओपियाच्या एर्टा एले पर्वतरांगेतील हेली गुब्बी ज्वालामुखीमधून रविवारी सकाळी राख आणि सल्फर डायऑक्साइडचे मोठे ढग उठताना दिसले. टुलूज व्होल्कॅनिक ॲश ॲडव्हायझरी सेंटरच्या सॅटेलाइट मूल्यांकनानुसार, हे ढग १० ते १५ किलोमीटर उंचीवर पोहोचले आणि लाल समुद्राच्या पलीकडे पूर्वेकडे सरकले. राखेच्या ढगांनी ओमान आणि येमेनच्या भागांवर आधीच परिणाम केला आहे, ज्यामुळे पर्यावरण आणि हवाई वाहतुकीसंदर्भात सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
खलीज टाइम्सच्या वृत्तानुसार, ओमानच्या पर्यावरण प्राधिकरणाने ज्वालामुखीचा वायू आणि राखेमुळे होणाऱ्या परिणामांबद्दल इशारा दिला आहे. तर, शास्त्रज्ञांनी या घटनेला इथिओपियाच्या इतिहासातील सर्वात अनोख्या घटनांपैकी एक म्हटले आहे.