
न्यूयॉर्क : अवकाशात क्षेपणास्त्रे, उपग्रहाद्वारे हल्ले आणि जागतिक शक्ती संतुलनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी १७५ अब्ज डॉलर्स खर्चाचा 'गोल्डन डोम' नावाचा स्पेस मिसाइल डिफेन्स सिस्टम लाँच केला आहे. ही योजना अवकाशात उपग्रह-आधारित क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून रशिया, चीन, इराण आणि उत्तर कोरियासारख्या देशांच्या अण्वस्त्र आणि पारंपरिक क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता बाळगते.
गोल्डन डोमला १९८० च्या दशकातील स्ट्रॅटेजिक डिफेन्स इनिशिएटिव्ह (SDI) किंवा स्टार वॉर्स कार्यक्रमाची आधुनिक आवृत्ती मानले जात आहे, जी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन (Ronald Reagan) यांनी सुरू केली होती. त्यावेळी तांत्रिक अडचणी आणि आंतरराष्ट्रीय करारांमुळे ती थांबवण्यात आली होती. परंतु ट्रम्प यांनी ती पुन्हा सक्रिय करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे.
गोल्डन डोम अंतर्गत उपग्रहावरून थेट पृथ्वीवरील क्षेपणास्त्रांवर हल्ला करता येईल. सिक्युअर वर्ल्ड फाउंडेशनच्या तज्ज्ञ व्हिक्टोरिया सॅमसन म्हणाल्या: हे पाऊल पेंडोरा बॉक्स उघडण्यासारखे आहे, ज्याचे दीर्घकालीन परिणाम आपण विचारात घेतलेले नाहीत.
चीनने (China) या प्रकल्पावरून गंभीर चिंता व्यक्त केली आहे आणि तो आक्रमक असल्याचे सांगत अमेरिकेला तो ताबडतोब बंद करण्याचे आवाहन केले आहे. रशियाने (Russia) संकेत दिला आहे की हे पाऊल अमेरिका आणि रशियामधील अण्वस्त्र नियंत्रण वाटाघाटी यावर परिणाम करु शकते.
जो बायडेन (Joe Biden) यांच्या कारकिर्दीत अमेरिकेने अवकाशात लष्करी तयारीची बाजू मांडली होती, परंतु ट्रम्प यांचा गोल्डन डोम हा एक आक्रमक धोरणात्मक बदल आहे.
SpaceX चे एलन मस्क (Elon Musk) आणि Palantir सारख्या कंपन्या गोल्डन डोमच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. L3Harris आधीच त्याचे सेन्सर नेटवर्क तयार करण्यात गुंतले आहे. Lockheed Martin आणि RTX Corp यांनाही संभाव्य कंत्राटदारांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
तथापि, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा निधी अद्याप निश्चित नाही. रिपब्लिकन खासदारांनी तो २५ अब्ज डॉलर्सच्या सुरुवातीच्या रकमेसह सादर केला आहे, जो १५० अब्ज डॉलर्सच्या संरक्षण पॅकेजचा भाग आहे. परंतु हा reconciliation bill वादात सापडला आहे आणि काँग्रेसकडून मंजूर होणे कठीण मानले जात आहे. गोल्डन डोमसारख्या योजनेमुळे अवकाशातील शांतता आणि संतुलनाला मोठा धक्का बसू शकतो, असे मानले जात आहे. जर जगातील इतर शक्तीही याच मार्गावर चालू लागल्या तर एक नवीन अवकाश शस्त्रास्त्र शर्यत सुरू होऊ शकते, ज्याचा शेवट कोणालाच माहीत नाही.