घटस्फोटासाठी वर्षानुवर्षे वाट पहावी लागणार नाही. आता वीकेंडमध्ये घटस्फोट मिळू शकतो. हॉटेलमध्ये जाऊन पैसे दिले की झाले. कोणताही ताण न घेता तुम्ही वेगळे होऊ शकता.
सध्याच्या काळात छोट्या-छोट्या कारणांमुळे दाम्पत्यात वितुष्ट येत असताना घटस्फोटाचा एक नवीन आणि आश्चर्यकारक ट्रेंड समोर आला आहे. घटस्फोटासाठी महिने-वर्षे वाट पहावी लागणार नाही. एका वीकेंडमध्ये तुमचा घटस्फोट होऊ शकतो. नेदरलँड्समध्ये एक नवीन व्यवसाय वेगाने वाढत आहे. शुक्रवारी विवाहित म्हणून हॉटेलमध्ये चेक इन केले तर रविवारी घटस्फोटित म्हणून चेक आउट करता येते.
घटस्फोट हॉटेल : ३३ वर्षीय उद्योजक जिम हफेन्स यांनी हे हॉटेल सुरू केले आहे. या हॉटेलमध्ये तुम्हाला घटस्फोटाचे पॅकेज मिळते. वकील, मध्यस्थ आणि हॉटेलचा स्टाफ तुमची वाट पाहत असतात. तुम्ही शुक्रवारी हॉटेलमध्ये गेल्यावर तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाते. रविवारी तुम्ही घटस्फोटाचे कागदपत्र घेऊन हॉटेलमधून बाहेर पडू शकता. यासाठी एक निश्चित शुल्क आकारले जाते.
घटस्फोट हॉटेलचे फायदे काय? : हे हॉटेल घटस्फोट घेऊ इच्छिणाऱ्या दाम्पत्यांसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला घटस्फोटासाठी वारंवार न्यायालयात जावे लागत नाही. वर्षानुवर्षे वाट पहावी लागत नाही. घटस्फोटाची प्रक्रिया कोणताही ताण न घेता जलद आणि शांततेत पूर्ण करण्यासाठी, कायदेशीर सल्ला, मानसिक आधार आणि मध्यस्थी या सर्वांची सुविधा हॉटेलमध्ये एकाच वेळी उपलब्ध करून दिली जाते.
इतर देशांमध्येही सुरू होणार हॉटेल : हे हॉटेल नेदरलँड्समधील हार्लेम शहरात आहे. याला 'द सेपरेशन इन' असेही म्हणतात. नेदरलँड्समध्ये हे हॉटेल खूप लोकप्रिय आहे. आतापर्यंत १७ दाम्पत्यांनी घटस्फोट घेतला आहे. त्यापैकी १६ जण आनंदाने आणि कोणत्याही समस्येशिवाय वेगळे झाले आहेत. या हॉटेलचे मालक जिम हफेन्स आपला व्यवसाय इतर देशांमध्येही वाढवण्याचा विचार करत आहेत. अमेरिकेत लवकरच ही सेवा उपलब्ध होणार आहे. न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिसमधील मोठ्या हॉटेल्सची निवड केली जात आहे.
अमेरिकन वकील काय म्हणतात? : जिम हफेन्स यांच्या या व्यवसायाला काहींचा विरोध आहे. ही कल्पना जितकी आकर्षक आहे तितकीच अव्यवहार्य आहे, असे ते म्हणतात. घटस्फोटाचा काळ हा खूप भावनिक असतो आणि सर्वकाही दोन दिवसांत संपवणे इतके सोपे नाही. याला एक व्यवसाय किंवा पॅकेज म्हणून देणे योग्य नाही, असे एका अमेरिकन वकिलाने सांगितले.
घटस्फोट हा एक मोठा व्यवसाय : भारतात घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेत तर हा एक मोठा व्यवसाय आहे. घटस्फोट उद्योग १७५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. दरवर्षी अमेरिकेत १.२ दशलक्ष लोक घटस्फोटासाठी अर्ज करतात. अशा लोकांसाठी हे डिव्होर्स हॉटेल खूप उपयुक्त ठरेल. अमेरिकेत मोठी क्रांती घडवण्यासाठी हे हॉटेल सज्ज होत आहे. भारतात दरवर्षी ४३ हजार लोक घटस्फोटासाठी अर्ज करतात. अमेरिकेशी तुलना केली तर ही संख्या कमी वाटत असली तरी भारतासाठी ही मोठी संख्या आहे.