
मियामी : लहानपणीचा छंद तुम्हाला करोडपती बनवू शकतो, यावर विश्वास बसणार नाही, पण मियामीतील आंद्रेस फर्नांडिसने हे खरं करून दाखवलं आहे. लहान मुलं खेळून झाल्यावर फेकून देतात, त्याच 'पोकेमोन कार्ड्स' विकून आंद्रेसने आज कोट्यवधींची कंपनी उभी केली आहे. 'बिझनेस इनसायडर'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या या अविश्वसनीय प्रवासाबद्दल सांगितलं.
आंद्रेस म्हणाला, "कॉलेजला जाताना भविष्यात काय करायचं, याबद्दल माझ्या डोक्यात काहीच स्पष्ट नव्हतं. आईच्या हट्टापायी मी बिझनेस कोर्सला प्रवेश घेतला. पण तो अभ्यास मला खूपच कंटाळवाणा वाटला. त्यामुळे फक्त एका सेमिस्टरनंतर मी कॉलेज सोडून दिलं. कॉर्पोरेट नोकरीसाठी बिझनेस डिग्री घेण्याऐवजी, स्वतःचा खरा बिझनेस उभा करायचा असं मी ठरवलं."
आज आंद्रेस 'मिंटली कलेक्ट्स' (Mintly Collects) नावाच्या कंपनीचा मालक आहे. गेल्या वर्षी या कंपनीने तब्बल ७४.४ कोटी रुपयांची विक्री केली होती. या चालू वर्षात कंपनीने ८३ कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.
आयुष्य बदलणारी ५ डॉलर्सची गुंतवणूक
लहानपणी पोकेमोन व्हिडिओ गेम्स खेळत मोठा झाला असला तरी, सुरुवातीला आंद्रेसला कार्ड्स गोळा करण्यात अजिबात रस नव्हता. पण एकदा त्याने आपल्या चुलतभावाला भेट देण्यासाठी सुपरमार्केटमधून ५ डॉलरचं (अंदाजे ४०० रुपये) एक पोकेमोन कार्ड पॅक विकत घेतलं आणि इथूनच त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्या पॅकमध्ये त्याला तब्बल १०० डॉलर्स (अंदाजे ८,३०० रुपये) किमतीचं एक दुर्मिळ कार्ड सापडलं.
कमी गुंतवणुकीत मोठा नफा मिळू शकतो, हे सत्य त्याच्या लक्षात आलं. मग त्याने आपल्याजवळच्या पैशातून आणखी कार्ड्स विकत घ्यायला आणि सोशल मीडियावर पोस्ट करून ती पुन्हा विकायला सुरुवात केली.
आंद्रेसने इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून थेट कार्ड्स विकायला सुरुवात केली. पाहता पाहता त्याचे ३०,००० फॉलोअर्स झाले. २०२० च्या अखेरीस, 'वॉट्नॉट' (Whatnot) या लाईव्ह-शॉपिंग प्लॅटफॉर्मने आपला पोकेमोन विभाग सुरू केला, तेव्हा त्याच्या पहिल्या पाच अधिकृत स्ट्रीमर्सपैकी एक म्हणून आंद्रेसची निवड झाली. यामुळे त्याच्या व्यवसायाला मोठी गती मिळाली.
कोणतीही औपचारिक बिझनेस डिग्री नसताना, केवळ मेहनत आणि चुकांमधून शिकत तो पुढे गेला. व्यवसाय वाढवण्यासाठी त्याने सुमारे १.२५ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आणि त्याचा हा निर्णय प्रचंड यशस्वी ठरला. आज 'मिंटली कलेक्ट्स'च्या स्ट्रीमिंग अकाउंट्सवर ५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
नवीन पिढीला सल्ला देताना आंद्रेस म्हणतो, "आजच्या या यशापर्यंत पोहोचण्यासाठी मी अनेक वर्षे एक रुपयाही पगार न घेता काम केलं. 'प्रवाहाबरोबर वाहत जा, सगळं ठीक होईल' ही विचारसरणी आता जुनी झाली आहे. आज आपण एका वेगवान जगात जगतोय. एक स्पष्ट ध्येय आणि आवड शोधा. एखादी गोष्ट चालत नसेल, तर नवीन मार्ग शोधा. टेक क्षेत्रात असाल तर विनामोबदला काम करून किंवा स्वयंसेवा करून अनुभव मिळवा. मेहनत केली की मार्ग आपोआप सापडतो."