
चीनमधील एका नवविवाहित जोडप्याने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या दोघांचंही नाव अगदी सेम आहे. चिनी भाषेत ते एकाच पद्धतीने लिहिलं जातं आणि विशेष म्हणजे दोघेही एकाच क्षेत्रात काम करतात. ३३ वर्षांचा नवरदेव झू झियाओकॉन्ग (Zhu Xiaocong) आणि २८ वर्षांची नवरी झू झियाओकॉन्ग यांनी ६ ऑक्टोबर रोजी पूर्व चीनमधील झेजियांग प्रांतात लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचं पोस्टर ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर ही अनोखी लव्हस्टोरी समोर आली. या पोस्टरवरून लोकांना समजलं की नवरा-बायको दोघांचंही नाव अगदी सारखंच आहे.
सुरुवातीला हे पाहून अनेक नातेवाईकही गोंधळून गेले होते. नवरीने सांगितलं की, तिच्या नवऱ्याला न ओळखणाऱ्या काही नातेवाईकांना वाटलं की, लग्न पत्रिकेवर दोघांचंही नाव सेम छापून वेडिंग प्लॅनरने मोठी चूक केली आहे.
पण जेव्हा त्यांना समजलं की ही कोणतीही चूक नसून एक भन्नाट योगायोग आहे, तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं. हे जोडपं 'एकमेकांसाठीच बनलं आहे', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हे दोघेही झेजियांग प्रांतातलेच आहेत आणि नागरी विमान वाहतूक क्षेत्रात काम करतात. नवरी फ्लाईट अटेंडंट आहे, तर नवरा एव्हिएशन सेफ्टी ऑफिसर म्हणून काम करतो.
विशेष म्हणजे, प्रेमात पडण्यापूर्वीच त्यांची पहिली भेट झाली होती. २०१६ मध्ये दोघेही एकाच जॉब फेअरमध्ये गेले होते. तिथे एका मुलाखतकाराने 'झू झियाओकॉन्ग' असं नाव पुकारलं. तेव्हा सर्वांना आश्चर्यचकित करत दोघेही एकाच वेळी उभे राहिले.
त्यावेळी, आपल्यासारखंच नाव असणारं दुसरं कोणीतरी आहे, हे पाहून त्यांना फक्त गंमत वाटली. त्यांनी याकडे एक छोटासा योगायोग म्हणून दुर्लक्ष केलं. पण हाच योगायोग त्यांना भविष्यात एकत्र आणेल, याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती.
नवरदेवाचा एक सहकारी नवरीचा क्लासमेट होता. त्याने दोघांचं नाव सेम असल्याचं पाहिलं आणि त्यांची ओळख करून दिली. या ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. २०१९ मध्ये त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.
त्यांच्या या सेम नावामुळे त्यांना काही अडचणींचाही सामना करावा लागला. मे महिन्यात जेव्हा त्यांनी लग्नाची नोंदणी केली आणि प्रॉपर्टीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केला, तेव्हा कॉम्प्युटर सिस्टीममध्ये त्यांची माहिती ऑटोमॅटिक प्रोसेस होऊ शकली नाही. अधिकाऱ्यांना त्यांची माहिती मॅन्युअली भरावी लागली. त्यामुळे एका साध्या कामासाठी त्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
प्रवास करतानाही त्यांच्या नावामुळे अनेकदा गोंधळ उडाला आहे. नवरीने सोशल मीडियावर सांगितलं की, एकदा सुट्टीत फिरायला जाताना त्यांनी चुकून एकमेकांचे बोर्डिंग पास बदलले होते. पासवर जेंडर (लिंग) लिहिलेलं नसल्यामुळे, सिक्युरिटी गार्ड्सना त्यांची ओळख पटवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.
त्यांच्या मित्रांनाही अनेकदा त्यांना हाक मारताना कन्फ्युजन व्हायचं. नवरीने SCMP ला सांगितलं की, जेव्हा कोणी 'झियाओकॉन्ग' अशी हाक मारायचं, तेव्हा दोघेही ओ द्यायचे. यामुळे मित्रही गोंधळून जायचे की नक्की कोणाशी बोलायचं आहे.
हा गोंधळ कायमचा संपवण्यासाठी त्यांनी एक सोपी पद्धत शोधून काढली. नवऱ्याला 'दा कॉन्ग' (Da Cong) म्हणजे 'मोठा कॉन्ग' आणि बायकोला 'शिआओ कॉन्ग' (Xiao Cong) म्हणजे 'लहान कॉन्ग' असं टोपणनाव देण्यात आलं.