
बिजिंग : चीनमध्ये एका ड्रायव्हरसोबत अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. डोंगराळ रस्त्यावरून जात असताना दरड कोसळण्याच्या काही सेकंद आधीच त्याला परत फिरण्यास सांगण्यात आलं आणि त्याचा जीव वाचला. ही घटना गेल्या आठवड्यात सिचुआन प्रांतात घडली, जिथे सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा ड्रायव्हर डोंगराळ रस्त्यावरून पुढे जात होता, तेव्हा काही अधिकारी किंवा स्थानिक लोकांनी त्याला हात दाखवून मागे फिरण्याचा इशारा दिला. त्याने गाडी मागे घेताच, काही क्षणांतच डोंगराचा मोठा भाग खाली कोसळला आणि रस्त्यावर दगड-मातीचा ढिगारा आला. जर तो ड्रायव्हर पुढे गेला असता, तर थेट या दरडीखाली सापडला असता.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, दरड कोसळण्यापूर्वी ड्रायव्हर गाडी थांबवून रिव्हर्स घेतो आणि ढिगारा त्याच्या गाडीला थोडक्यात हुलकावणी देतो.
रिपोर्टनुसार, सिचुआनच्या डोंगराळ भागातील रस्त्यावर ही दरड कोसळली. सततच्या पावसामुळे इथली माती भुसभुशीत झाली होती. स्थानिक प्रशासनाने या भागात दरड कोसळण्याचा धोका असल्याचा इशारा आधीच दिला होता.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ड्रायव्हर सुखरूप असून, गाडीचं किरकोळ नुकसान झालं आहे.
स्थानिक प्रशासनाने नागरिकांना धोकादायक भागांमध्ये प्रवास टाळण्याचं आणि सुरक्षा निर्देशांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच, रस्त्यावरील ढिगारा हटवण्यासाठी आणि नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पथकं तैनात करण्यात आली आहेत. या भयंकर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून देव तारी त्याला कोण मारी, काळ आला होता पण वेळ नाही…. अशाच प्रतिक्रिया नेटकऱ्यांमधून येत आहेत.