वॉलमार्ट ओव्हनमध्ये तरुणीचा मृतदेह, धक्कादायक खुलासा

कॅनडामधील वॉलमार्ट स्टोअरच्या ओव्हनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणीचा मृतदेह आढळला. सहकाऱ्याचा दावा, ही घटना अपघात नसून कोणीतरी तिला ओव्हनमध्ये ढकलले असावे.

ओटावा: कॅनडामधील एका वॉलमार्ट स्टोअरच्या बेकरी विभागातील वॉक-इन ओव्हनमध्ये भारतीय वंशाच्या एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याच्या घटनेत एका कर्मचाऱ्याने धक्कादायक खुलासा केला आहे. ही घटना अपघात नसून १९ वर्षीय गुरसिमरन कौरला कोणीतरी ओव्हनमध्ये ढकलले असावे, असा आरोप वॉलमार्टच्या कर्मचाऱ्याने केला आहे. सहकारी क्रिस ब्रिसीने हा खुलासा केला आहे. ऑक्टोबर १९ रोजी गुरसिमरन कौरचा मृतदेह हॅलिफॅक्समधील सुपरस्टोअरमधील ओव्हनमध्ये आढळून आला होता.

गेल्या दोन वर्षांपासून दुकानात काम करणाऱ्या कौरचा जळालेला मृतदेह तिच्या आईनेच पाहिला. तपास सुरू झाला असला तरी पोलिसांना घटनेमागील रहस्य उलगडण्यात यश आलेले नाही. द मिररच्या वृत्तानुसार, वॉलमार्टमध्ये काम करताना वापरत असलेला ओव्हन बाहेरून सुरू केला जाऊ शकतो आणि त्याचा दरवाजा उघडणे खूप कठीण असल्याचे ब्रिसीने सांगितले.

ओव्हनमध्ये आत जाण्यासाठी वाकून जावे लागते. ओव्हनमध्ये एक इमर्जन्सी लॅच आहे आणि कोणत्याही कामगाराला ओव्हनमध्ये जाण्याचे काम नव्हते, असे तिने नमूद केले. ओव्हन बंद करण्यासाठी सर्व शक्तीनिशी लॅच ढकलावा लागतो. अशा प्रकारे कोणीही स्वतःला बंद करण्याची शक्यता नाही. त्यामुळेच दुसऱ्या कोणीतरी गुरसिमरन कौरला ओव्हनमध्ये ढकलले असावे असे मला वाटते, असे ती म्हणाली. दरम्यान, ही घटना कंपनीसाठी हृदयद्रावक असून कौरच्या कुटुंबियांसोबत कंपनी असल्याचे वॉलमार्ट कॅनडाच्या निवेदनात म्हटले आहे.

Share this article