केनियन सरकारने भारतीय मूळच्या कावळ्यांना मारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत दहा लाख कावळ्यांना मारण्यात येणार आहे.
नैरोबी : भारतीय मूळ असलेल्या कावळ्यांमुळे केनिया देश हैराण झाला आहे. या देशात आगामी सहा महिन्यांत तब्बल 10 लाख कावळे मारण्यात येणार आहेत. केनियात कावळ्यांचा उपद्रव वाढला आहे. कावळ्यांच्या वाढत्या संख्येमुळे शेती, हॉटेल, पर्यटन व्यवसायावर परिणाम होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, केनियन सरकारने घेतलेल्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
केनियन सरकारने कोणता निर्णय घेतला आहे?
केनियन सरकारने कावळ्यांविरुद्ध एका प्रकारचे युद्धच छेडले आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत देशातील साधारण दहा लाख कावळे मारण्याचे उद्दीष्ट सरकारतर्फे निश्चित करण्यात आले आहे. भारतीय वंशाचे कावळे हे केनियन परिसंस्थेत तेवढे महत्त्वाचे नाहीत, असं केनियन सरकारचं म्हणणं आहे. केनियम वाईल्डलाईफ सर्व्हिसच्या मध्ये भारतीय कावळा हा परदेशी पक्षी आहे. तो मूळचा केनियन नाही. त्यामुळे किनारपट्टी भागातील शेतकरी आणि हॉटेल व्यवसायिकांसाठी पक्ष डोकेदुखी ठरत आहे, अशी भूमिका मांडत केनियन सरकारने आगामी काही महिन्यांत दहा लाख कावळे मारण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय कावळ्यांचा केनियाला त्रास
भारतीय वंशाचे हे कावळे 1940 च्या आसपास पूर्ण आफ्रिकेत आल्याचे सांगितले जाते. या कावळ्यांमुळे तेथील स्थानिक प्रजातींवर नकारात्मक परिणाम होतो की काय, अशी भीती केनिया तसेच इतर आफ्रिकन देशांकडून व्यक्त केली जाते. यासह या भारतीय कावळ्यांमुळे केनियाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम पडत असल्याचे तेथील स्थानिक आणि सरकारचे म्हणणे आहे. केनियन सरकारला पर्यटनातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. त्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेसाठी पर्यटन व्यवसाय फार महत्त्वाचा आहे. मात्र केनियात येणाऱ्या पर्यटकांसाठी भारतीय कावळे त्रासदायक ठरत आहेत. तसेच याचा फटका हॉटेल व्यवसायिकांनाही बसतोय. पर्यटक हॉटेलमध्ये जेव्हा जेवत असतात, तेव्हा हे कावळे त्यांना त्रास देतात. अन्नाच्या शोधात असलेल्या या कावळ्यांचा पर्यटकांना त्रास होतो, अशा तक्रारी केनियातील हॉटेल व्यवसायिक करतात.
शेतकरी, हॉटेल व्यवसायिकांना फटका
केनियातील शेतकऱ्यांनीसुद्धा भारतीय प्रजातीचे कावळे त्रासदायक ठरत असल्याचे म्हटले आहे. स्थानिक पत्रकारांशी बोलताना तेथील मावानजानी रुनया या शेतकऱ्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. नुकतेच उगवलेले पीक आणि कोंबडीची पिलं हे या कावळ्यांचे अन्न आहे. त्यामुळे ही पिलं कावळ्यांच्या भक्ष्यस्थानी सापडू नयेत म्हणून आम्हाला कित्येक महिने त्यांचे रक्षण करावे लागते. आम्ही लक्ष दिले नाही तर हे कावळे दिवसाला कोंबड्यांची 20-20 पिलं घेऊन जाऊ शकतात.
याच कारणामुळे मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन आता केनियन सरकारने या वर्षाच्या शेवटपर्यंत दहा लाख कावळे मारण्याचे ठरवले आहे.