अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीनंतर एक्स मधून वापरकर्ते मोठ्या संख्येने ब्लूस्कायकडे वळत आहेत.
न्यू यॉर्क: अमेरिकेचे श्रीमंत उद्योजक एलॉन मस्क यांच्या मालकीचे एक्स (पूर्वीचे ट्विटर) याला पर्याय म्हणून उदयास येत असलेल्या मायक्रो ब्लॉगिंग अॅप ब्लूस्कायने एक नवा टप्पा गाठला आहे. ब्लूस्कायवरील वापरकर्त्यांची संख्या २० दशलक्ष म्हणजेच दोन कोटींच्या पुढे गेली आहे. ब्लूस्कायच्या सीईओ जय ग्रॅबर यांनी ही माहिती दिली.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्यानंतर एक्स मधून वापरकर्ते ब्लूस्कायकडे वळू लागले. एकाच दिवसात ११५,००० एक्स अकाउंट डिएक्टिव्हेट करण्यात आले, असे आकडेवारीवरून दिसून येते. ट्रम्पच्या विरोधात असलेले आणि एक्सच्या धोरणांवर टीका करणारे वापरकर्ते एक्सला रामराम ठोकत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे मित्र म्हणून ओळखले जाणारे श्रीमंत उद्योजक आणि एक्सचे सीईओ एलॉन मस्क आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीनंतर ब्लूस्कायच्या वापरकर्त्यांमध्ये ५०० टक्के वाढ झाली आहे. अमेरिकेव्यतिरिक्त जपान आणि ब्राझीलमध्ये ब्लूस्कायचे सर्वाधिक वापरकर्ते आहेत. मस्कसोबतच्या कायदेशीर लढाईनंतर ब्राझीलमध्ये एक्सवर बंदी घालण्यात आली होती, त्यानंतर ब्राझीलमधील वापरकर्त्यांनी मोठ्या संख्येने ब्लूस्कायवर अकाउंट उघडले.
ट्विटरचे पूर्वीचे सीईओ जॅक डोर्सी यांनी २०२३ मध्ये ब्लूस्कायची स्थापना केली. मात्र ते जास्त काळ तिथे राहिले नाहीत. सध्या ब्लूस्कायमध्ये खूप कमी कर्मचारी आहेत. जय ग्रॅबर म्हणतात की त्यांच्या हाताखाली फक्त २० पूर्णवेळ कर्मचारी आहेत. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला १० लाख ब्लूस्काय वापरकर्त्यांचे कंटेंट मॉडरेट करावे लागते. कंपनी अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी सांगितले. विक्रमी वाढ होत असली तरी एक्सच्या तुलनेत ब्लूस्काय अजूनही बाल्यावस्थेत आहे. मायक्रो ब्लॉगिंग साइट्समध्ये एक्सचे २५९ दशलक्ष आणि मेटाच्या थ्रेड्सचे २७५ दशलक्ष मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत.