Balen Shah: बंगळुरूत शिकलेला 'रॅपर' आता नेपाळचा पंतप्रधान? निवडणुकीत मोठा उलटफेर

Published : Mar 07, 2026, 01:01 PM IST
Bengaluru Educated Rapper Balen Shah Poised to Become Nepals Next Prime Minister

सार

Bengaluru Educated Rapper Balen Shah Poised to Become Nepals Next Prime Minister: बंगळुरूच्या निट्टे मीनाक्षी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग शिकलेले बालेन्द्र शाह यांनी नेपाळच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. त्यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला (RSP) स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

काठमांडू (दि. ७ मार्च): एकेकाळी बंगळुरूत शिक्षण घेतलेले आणि राजकारणात येण्यापूर्वी रॅपर म्हणून ओळखले जाणारे बालेन्द्र शाह उर्फ बालेन यांनी नेपाळच्या राजकारणात धुमाकूळ घातला आहे. नेपाळमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाने दणदणीत विजय मिळवला असून, आता ते पंतप्रधानपदाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

के. पी. शर्मा ओली सरकार कोसळल्यानंतर ५ मार्च रोजी नेपाळमध्ये निवडणुका झाल्या आणि सोमवारी निकाल जाहीर झाले. या निकालांमध्ये बालेन शाह यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने (RSP) स्पष्ट बहुमत मिळवत सर्वांनाच धक्का दिला. एकूण ९४ जागांपैकी तब्बल ७० जागांवर RSP ने विजय मिळवला. तर, नेपाळी काँग्रेस, सीपीएन-यूएमएल आणि नेपाळी कम्युनिस्ट पक्षांना प्रत्येकी फक्त ६ जागांवर समाधान मानावं लागलं.

या निवडणुकीत बालेन शाह यांनी चार वेळा पंतप्रधान राहिलेल्या के. पी. शर्मा ओली यांचा ४,८४२ मतांच्या फरकाने पराभव केला. विशेष म्हणजे, बालेन शाह हे राजकारणात येण्यापूर्वी काठमांडूचे महापौर होते. त्यांचं शिक्षण भारतात झालं आहे. त्यांनी २०१६ ते २०१८ या काळात बेळगावच्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (VTU) अंतर्गत येणाऱ्या बंगळुरूच्या निट्टे मीनाक्षी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NMIT) मधून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये एम.टेकची पदवी घेतली आहे.

RSP पक्षाची स्थापना अवघ्या चार वर्षांपूर्वी माजी पत्रकार रबी लामिछाने यांनी केली होती. तर, माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या सीपीएन-यूएमएल पक्षाला या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनांनंतर ५ मार्च रोजी झालेल्या या निवडणुकीत ५८% मतदारांनी आपला हक्क बजावला. मतमोजणीला तीन ते चार दिवस लागतील आणि ९ मार्चपर्यंत ती पूर्ण करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे.

नेपाळमध्ये खासदार निवडण्याच्या दोन पद्धती

नेपाळची निवडणूक प्रणाली ही मिश्र स्वरूपाची आहे. म्हणजेच, खासदार दोन वेगवेगळ्या पद्धतींनी निवडले जातात: थेट निवडणूक आणि पक्षाला मिळालेल्या एकूण मतांनुसार.

१. थेट निवडणूक (First Past the Post)
संसदेच्या एकूण २७५ जागांपैकी १६५ जागांवर थेट निवडणूक होते. प्रत्येक मतदारसंघात लोक आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत देतात आणि सर्वाधिक मतं मिळवणारा उमेदवार विजयी होतो.

२. मतांच्या टक्केवारीनुसार जागा (Proportional Representation)
उरलेल्या ११० जागा पक्षांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीच्या आधारावर दिल्या जातात. यात मतदार उमेदवाराला नाही, तर पक्षाला मत देतात. पक्षाला देशभरात मिळालेल्या एकूण मतांच्या टक्केवारीनुसार त्यांना संसदेत जागा मिळतात.

या प्रणालीमुळे छोट्या पक्षांना आणि विविध सामाजिक गटांनाही संसदेत प्रतिनिधित्व मिळतं आणि कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी निर्माण होत नाही.

RSP च्या मोठ्या यशामागे कारण काय?

नेपाळच्या मिश्र निवडणूक प्रणालीमुळे कोणत्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळवणं खूप अवघड मानलं जात होतं. पण RSP ने जवळपास दोन तृतीयांश जागा जिंकून इतिहास घडवला आहे. नेपाळमध्ये संविधान लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच एका पक्षाला एवढ्या जागा मिळाल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, काठमांडूचे महापौर असताना बालेन शाह यांची स्वच्छ प्रतिमा या यशामागे एक प्रमुख कारण आहे.

राज्यशास्त्राचे प्राध्यापक लोक राज बराल यांच्या मते, "गगन थापा यांच्या नेतृत्वाखाली नेपाळी काँग्रेसने आपली जुनी प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. जुन्या पक्षांच्या कारभाराला लोक कंटाळले होते आणि नाराज होते. याच नाराजीमुळे RSP च्या बाजूने एक लाट निर्माण झाली. मूलभूत सुविधा पुरवण्यात जुनी सरकारं अपयशी ठरली होती आणि बालेन शाह यांच्या लोकप्रियतेने ही लाट आणखी मजबूत केली." मात्र, सत्तेत आल्यानंतर कामगिरी चांगली नसेल, तर अशा लाटा कायम टिकत नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

इराण युद्धाचा 'मास्टरमाइंड', नेतन्याहूंनाही नडतो, कोण आहे हा इस्रायली लष्करप्रमुख?
Tehran Airstrike : तेहरानच्या पोटात घुसून हल्ला, इस्रायलच्या 50 विमानांनी मोसादच्या मदतीने उडवला महाकाय बंकर