
Khaleda Zia Passes Away : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे निधन झाले. आजारपणामुळे त्यांच्यावर ढाक्यातील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी सहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. त्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्षा होत्या. बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान असलेल्या झिया यांना लिव्हर सिरोसिस, संधिवात आणि हृदयरोग यांसारख्या अनेक आरोग्य समस्या होत्या.
खालिदा झिया 1991 मध्ये पहिल्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या. 1996 पर्यंत त्या या पदावर होत्या. त्यानंतर त्या पुन्हा निवडून आल्या, पण कार्यकाळ पूर्ण करू शकल्या नाहीत. नंतर 2001-2006 या काळातही त्यांनी पंतप्रधानपद भूषवले.
बांगलादेशचे माजी पंतप्रधान झियाउर रहमान यांच्या पत्नी असलेल्या खालिदा झिया, पतीच्या हत्येनंतर 1981 मध्ये राजकारणात सक्रिय झाल्या. या काळात त्यांनी बांगलादेशातील लष्करी राजवटीविरुद्धच्या जनआंदोलनांचे नेतृत्व केले. मात्र, 2018 मध्ये त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगवास झाला. नंतर प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांची शिक्षा स्थगित करण्यात आली. शेख हसीना सरकारने राजीनामा दिल्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये त्यांची तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर 2025 मध्ये बांगलादेश सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सर्व भ्रष्टाचार प्रकरणांतून निर्दोष मुक्त केले.