अल्बेनियामध्ये TikTok वर बंदी, १४ वर्षीय किशोराची हत्या

विद्यार्थ्याच्या हत्येला समर्थन देणारे व्हिडिओ TikTok वर दिसू लागले. त्यानंतर अल्बेनियाने एक वर्षासाठी TikTok वर बंदी घातली.

तिराना: चौदा वर्षांच्या विद्यार्थ्याची त्याच्या सहकारी विद्यार्थ्याने हत्या केल्यानंतर, अल्बेनियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म TikTok वर बंदी घातली आहे. युरोपीय देश अल्बेनियाने एक वर्षासाठी TikTok वर बंदी घातल्याचे जाहीर केले. गेल्या महिन्यात एका विद्यार्थ्याने त्याच्या १४ वर्षीय सहकारी विद्यार्थ्याची हत्या केली. दोघांमध्ये TikTok व्हिडिओमुळे वाद झाला होता. पोलिसांच्या तपासात हा वाद हत्येत परावर्तित झाल्याचे आढळून आले.

विद्यार्थ्यांमधील TikTok वादाचे व्हिडिओ आणि कमेंट्सचे स्क्रीनशॉट समोर आले होते. या हत्येला समर्थन देणारे व्हिडिओ TikTok वर दिसू लागले. त्यानंतर अल्बेनियाने एक वर्षासाठी TikTok वर बंदी घातली. शाळा सुरक्षित असाव्यात. मुलांमध्ये हिंसाचाराची वृत्ती निर्माण होऊ नये. देशभरातील शिक्षक आणि पालकांचे मत ऐकल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून पुढच्या वर्षीपासून बंदी लागू होईल, असे अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा म्हणाले.

दरम्यान, या घटनेची चौकशी सुरू असल्याचे TikTok अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने १४ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घातली आहे. फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी इत्यादी देशही मुलांच्या सोशल मीडिया वापरावर कठोर निर्बंध घालण्याचा विचार करत आहेत.

Share this article