ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून आलेले पार्सल बॉक्स तुम्ही पाहिले असतील. हे बॉक्स नेहमी तपकिरी रंगाचेच का असतात, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? यामागचं नेमकं कारण काय?
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचे पार्सल बॉक्स नेहमी तपकिरी रंगाचे असतात. आपण जेवणाची ऑर्डर देतो, तेव्हा येणारे बॉक्सही याच रंगाचे असतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे लाकडाचा मूळ रंग. कागद बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाच्या लगद्यामध्ये सेल्युलोज आणि लिग्निन हे घटक असतात. लाकूड नैसर्गिकरित्या तपकिरी रंगाचे असते. पुस्तके किंवा पांढरा कागद बनवताना रसायने आणि ब्लीचिंगचा वापर करून हा रंग काढला जातो. पण पार्सल बॉक्ससाठी वापरला जाणारा क्राफ्ट पेपर बनवताना लाकडाचा लगदा ब्लीच न करता नैसर्गिक स्थितीतच ठेवला जातो.
23
ब्लीच न केलेला कागद
ब्लीच न केलेला क्राफ्ट पेपर वापरण्यामागे वैज्ञानिक आणि आर्थिक कारणे आहेत. ब्लीचिंग केल्यावर कागद पांढरा होतो, पण त्यातील फायबर्स कमकुवत होतात. ब्लीच न केलेला नैसर्गिक तपकिरी कागद खूप मजबूत असतो. तो जास्त वजन आणि दाब सहज सहन करू शकतो. डिलिव्हरीच्या वेळी बॉक्स फाटू नयेत, यासाठी ही मजबुती खूप महत्त्वाची असते. याशिवाय, ब्लीचिंग किंवा रंगकाम न केल्यामुळे बॉक्स बनवण्याचा खर्चही खूप कमी होतो. यामुळेच कंपन्या आणि रेस्टॉरंट्सना पॅकेजिंग बॉक्स स्वस्तात मिळतात.
33
मातीत लवकर मिसळतात
हे तपकिरी रंगाचे बॉक्स पर्यावरणासाठी खूप सुरक्षित असतात. या बॉक्समध्ये रसायनांचा वापर कमी झाल्यामुळे ते मातीत लवकर मिसळतात. जुन्या कागदाचा पुनर्वापर करून नवीन बॉक्स बनवले, तरी त्यांचा रंग तपकिरीच राहतो. प्रवासात या बॉक्सवर धूळ किंवा छोटे डाग लागले, तरी ते सहसा दिसत नाहीत. याच कारणांमुळे टेक-अवे पॅकेजिंगसाठी तपकिरी रंगाचे बॉक्स ही पहिली पसंती बनली आहे.