
मुंबई : व्हॉट्सॲप युजर्ससाठी मेटा एक भन्नाट फीचर घेऊन येत आहे. आता व्हॉट्सॲपवर थर्ड पार्टी AI एजंट्सची एन्ट्री होणार आहे. सध्या या फीचरचं टेस्टिंग सुरू आहे. हे एजंट्स युजर्ससोबत चॅट करतील आणि त्यांची अनेक कामं चुटकीसरशी मार्गी लावतील. टेलिग्रामवर अशी सुविधा अनेक वर्षांपासून आहे, आता व्हॉट्सॲपही त्याच वाटेवर आहे. मेसेज ड्राफ्ट करणं, दिवसाचं प्लॅनिंग करणं किंवा कामांचं शेड्युल लावणं, यांसारख्या गोष्टींसाठी या एजंट्सचा खूप फायदा होईल.
हे फीचर रोलआउट झाल्यावर युजर्सना व्हॉट्सॲपच्या सेटिंग्समध्ये जाऊन स्वतःचे एजंट्स तयार करता येतील. तुम्ही या एजंटला नाव आणि प्रोफाईल पिक्चरही देऊ शकता. यानंतर व्हॉट्सॲपकडून एक API की (API Key) मिळेल. डेव्हलपरच्या सर्व्हिससोबत एजंटला कनेक्ट करण्यासाठी या कीचा वापर होईल. एकदा का सेटअप पूर्ण झाला, की तुम्ही तुमच्या नेहमीच्या कॉन्टॅक्ट्सप्रमाणे या एजंटसोबतही चॅट करू शकाल.
रिपोर्ट्सनुसार, युजर्स व्हॉट्सॲप सेटिंग्समधून जास्तीत जास्त ५ एजंट्स तयार करू शकतील. प्रत्येकाला वेगळं नाव आणि फोटो देता येईल. पण काळजी करण्याचं कारण नाही, कारण तुम्ही जे मेसेज आणि कंटेंट या एजंटसोबत शेअर कराल, तेवढंच त्याला वाचता येईल. तुमचे इतर पर्सनल चॅट्स, कॉन्टॅक्ट्स किंवा फोनमधील मीडिया फाईल्सपर्यंत या एजंटला पोहोचता येणार नाही.
तुमच्या नेहमीच्या व्हॉट्सॲप मेसेजेससारखे हे एजंटसोबतचे चॅट्स एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड नसतील. याचं कारण म्हणजे, हे एजंट्स थर्ड पार्टी डेव्हलपर्स कंट्रोल करतात. मेटाच्या एका सर्व्हिसद्वारे हे मेसेजेस हँडल केले जातात. शिवाय, प्रत्येक एजंट हा AI वरच आधारित असेल असं नाही; साधे बॉट्सही या सिस्टीमवर काम करू शकतील.
अँड्रॉइडसाठी व्हॉट्सॲप या फीचरवर काम करत असल्याच्या बातम्या आधीच आल्या होत्या. आता आयफोनवरही याचं टेस्टिंग सुरू असल्याची माहिती 'WABetaInfo' या वेबसाईटने दिली आहे. iOS साठी व्हॉट्सॲप बीटा व्हर्जन 26.37.10.70 मध्ये हे फीचर दिसलं आहे. टेस्टफ्लाईट (TestFlight) द्वारे हे बीटा व्हर्जन उपलब्ध करून देण्यात आलं आहे.
सध्या हे फीचर फक्त निवडक देशांमधील काही बीटा टेस्टर्ससाठीच उपलब्ध आहे. सर्व युजर्ससाठी हे कधी रोलआउट होईल, हे मेटाने अद्याप स्पष्ट केलेलं नाही. महत्त्वाचं म्हणजे, या एजंट चॅट्समध्ये 'डिसअपिअरिंग मेसेजेस' (Disappearing messages) फीचर सध्या काम करणार नाही. जर तुम्हाला एजंटला डिस्कनेक्ट करायचं असेल किंवा दुसरी की वापरायची असेल, तर तुम्ही API की रिसेटही करू शकता.