
WhatsApp Update मुंबई: व्हॉट्सॲपने जगभरातील युझर्ससाठी एक नवीन 'ग्रुप चॅट हिस्ट्री' फीचर आणलं आहे. अनेकदा ग्रुपमध्ये नवीन सदस्य आल्यावर त्यांना आधी काय चर्चा झाली, हे कळत नसे. हीच अडचण दूर करण्यासाठी व्हॉट्सॲपने हे नवीन अपडेट आणलं आहे. शुक्रवारी जाहीर झालेलं हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस युझर्सना टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. हे नवीन फीचर वापरण्यासाठी ॲप लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करणं गरजेचं आहे, असं कंपनीने सांगितलं आहे.
याआधी, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नवीन आलेल्या व्यक्तीला फक्त जॉईन झाल्यानंतरचे मेसेज दिसायचे. त्यामुळे ग्रुपमधील महत्त्वाच्या चर्चा आणि माहिती त्यांना मिळत नसे. जुने मेसेज पाहण्यासाठी ग्रुपमधील इतर सदस्यांना ते वेगळे फॉरवर्ड करावे लागायचे. पण आता या नवीन फीचरमुळे ॲडमिन आणि इतर सदस्यही नवीन आलेल्या व्यक्तीसोबत जुने मेसेज शेअर करू शकतील.
व्हॉट्सॲप ग्रुपमधील गेल्या २४ तासांतील २५ पासून ते १०० पर्यंतचे मेसेज निवडून नवीन सदस्यांना पाठवता येतील. ग्रुपच्या गरजेनुसार मेसेजची संख्या निवडण्याची सोयही आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे मॅन्युअल आहे, म्हणजे व्हॉट्सॲप आपोआप चॅट हिस्ट्री शेअर करणार नाही. जेव्हा एखादा नवीन सदस्य ग्रुपमध्ये येतो, तेव्हा ॲडमिन आणि इतर सदस्यांना जुने मेसेज शेअर करण्याचा पर्याय दिसेल. गरज वाटल्यास ॲडमिन हे फीचर ग्रुपसाठी बंदही ठेवू शकतात.
कंपनीने युझर्सच्या प्रायव्हसी आणि सुरक्षेला प्राधान्य दिलं आहे, असं व्हॉट्सॲपने स्पष्ट केलं आहे. शेअर होणारी ग्रुप हिस्ट्रीसुद्धा एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड असेल. याचा अर्थ, ग्रुपमधील सदस्यांशिवाय इतर कोणीही हे मेसेज पाहू शकणार नाही. जेव्हा हिस्ट्री शेअर केली जाईल, तेव्हा ग्रुपमधील सर्व सदस्यांना एक नोटिफिकेशन मिळेल. त्यात कोणी आणि केव्हा हिस्ट्री शेअर केली, याची माहिती असेल. हे हिस्ट्री मेसेज नेहमीच्या मेसेजपेक्षा थोडे वेगळे दिसतील. पर्सनल, प्रोफेशनल किंवा कम्युनिटी ग्रुप्स, अशा सर्व प्रकारच्या ग्रुप्ससाठी हे फीचर खूप फायद्याचं ठरू शकतं. यामुळे नवीन सदस्यांना चर्चेत पटकन सामील होता येईल आणि पुन्हा पुन्हा माहिती देण्याचा त्रास वाचेल, अशी अपेक्षा आहे.