
बदलत्या जीवनशैलीचे परिणाम मानवाच्या शारीरिक स्वास्थ्यावर होत आहेत. हे इतके गंभीर आहेत की, त्यावर वेळीच उपाय करण्याची गरज आहे. विविध आरोग्य संस्थांमार्फत करण्यात आलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष चिंता वाढविणारे आहेत. माणसांवरील ताणतणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शिवाय, जेवणाची आबाळ, जंक फूड आणि विविध प्रकारचे प्रदूषण याचा विळखा बसत चालला आहे. अलीकडेच झालेल्या महिलांबाबतच्या एका अभ्यासाचे निष्कर्षही विचार करायला लावणारे आहेत.
गर्भाशयात फायब्रॉइड्स (गाठी) असलेल्या महिलांना हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी समस्या होण्याचा धोका 80 टक्क्यांहून अधिक असतो, असे एका अभ्यासात दिसून आले आहे. हा अभ्यास अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या 'जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशन' या ओपन-ॲक्सेस, पीअर-रिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
गर्भाशयातील फायब्रॉइड्स ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये गर्भाशयाच्या वॉलवर किंवा आतमध्ये स्नायू आणि ऊतींची वाढ दिसून येते. या गाठी सामान्यतः कर्करोगाच्या नसतात (benign). महिलांमध्ये आढळणारा हा सर्वात सामान्य नॉन-कॅन्सरस ट्यूमर आहे. या स्थितीमुळे वेदना, अनियमित रक्तस्राव यांसारखी विविध लक्षणे दिसू शकतात.
फायब्रॉइड्स बियाण्याइतके लहान किंवा टरबुजाइतके मोठे असू शकतात. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, या गाठी गर्भाशयाच्या वॉलमध्ये, गर्भाशयाच्या मुख्य पोकळीत किंवा गर्भाशयाच्या बाहेरील बाजूस वाढू शकतात. नवीन अभ्यासानुसार, गर्भाशयातील फायब्रॉइड्स केवळ प्रजनन आरोग्यावरच नाही, तर हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम करतात.
अभ्यासात असे आढळून आले आहे की, गर्भाशयाच्या फायब्रॉइड्सने ग्रस्त असलेल्या महिलांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार होण्याचा धोका जास्त असतो. अभ्यासानुसार, फायब्रॉइड्स असलेल्या महिलांना 10 वर्षांच्या आत गंभीर हृदयविकार होण्याची शक्यता 81% जास्त होती.
फिलाडेल्फिया येथील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या पेरेलमन स्कूल ऑफ मेडिसिनमधील एपिडेमियोलॉजीच्या संशोधकांपैकी एक असलेल्या ज्युलिया डी. डिटोस्टो म्हणाल्या, “आमचे निष्कर्ष सूचित करतात की फायब्रॉइड्स हे उच्च हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी धोका असलेल्या महिलांना ओळखण्यासाठी एक महत्त्वाचे मार्कर म्हणून काम करू शकतात.”