UPI Global : UPI डिजिटल पेमेंट सर्व्हिस आता भारताबाहेरील ७ देशांत चालणार

भारतात सर्वत्र वापरली जाणारी UPI पेमेंट सर्व्हिस आता भारताबाहेरदेखील वापरता येणार आहे. ७ देशांमध्ये हि सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

Yogesh Dhakane | Published : Apr 9, 2024 8:26 AM IST

New Delhi I युपीआय पेमेंट प्लॅटफॉर्म हा भारताबाहेरीळ ७ देशांमध्ये सुरु करण्यात आल्याची माहिती भारत सरकारच्या वतीने नुकतीच देण्यात आली आहे. अलीकडेच श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये युपीआय पेमेंट प्लॅटफॉर्मची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या हस्ते करण्यात आली.

भारताबाहेर सर्वप्रथम युपीआय सुविधा भूतानमध्ये लॉन्च करण्यात आली होती. भूतानच्या रॉयल मॉनेटरी अथॉरिटीशी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने करार केल्यावर २०२१ मध्ये त्याठिकाणी हि सेवा सुरु करण्यात आली होती. यानंतर ३ वर्षांच्या कालावधीतच युपीआयचा विस्तार इतर सहा देशांमध्ये करण्यात आला आहे.

'या' सात देशांमध्ये करण्यात आली युपीआय सेवा सुरु :

  1. भूतान 
  2. सिंगापूर 
  3. नेपाळ 
  4. फ्रान्स 
  5. युनायटेड अरब अमिराती (UAE) 
  6. श्रीलंका 
  7. मॉरिशस

फ्रान्स हा युरोपमध्ये युपीआय स्वीकारणारा आणि लॉन्च करणारा पहिला देश आहे. फ्रान्समधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरमध्ये हि सुविधा सुरु करण्यात आली आहे. भारतासोबतच्या व्यापारामध्ये तिसरा मोठा भागीदार असणाऱ्या युनायटेड अरब अमिराती (UAE) ने देखील युपीआय पेमेंट पद्धत स्वीकारली आहे.

काय आहे युपीआय (UPI)?

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मोबाईलवरून पेमेंट करण्यासाठी UPI हि प्रणाली विकसित केली आहे. यामाध्यमातून केवळ क्यूआर कोड स्कॅन करून किंवा थेट मोबाईल नंबरवरून ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात. युपीआयशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये हे पैसे थेट ट्रान्सफर केले जातात. भारतामध्ये UPI BHIM ॲप, गुगल पे, पेटीएम, ऍमेझॉन पे, फोन पे, भारत पे आणि इतरही अनेक थर्ड पार्टी ॲप्स युपीआय पेमेंट्ससाठी वापरले जातात.

Share this article