
गेल्या सात महिन्यांपासून नोकरीशिवाय बंगळूरमध्ये राहणाऱ्या निकिता नावाच्या तरुणीने शेअर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. निकिताने तिच्या जानेवारी महिन्याच्या खर्चाचा हिशोब देणारा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या ती पालकांची मदत, इमर्जन्सी फंडमधील पैसे आणि LinkedIn कन्सल्टिंगमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर जगत असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
जानेवारी महिन्यात तिला आईकडून ३०,००० रुपये उधार घ्यावे लागल्याचेही निकिता सांगते. निकिताचे मुख्य खर्च खालीलप्रमाणे आहेत: भाडे: १३,०००, जेवण (किराणा आणि बाहेरचे खाणे): ८,४०२, सेल्फ केअर (फेशियल, वॅक्सिंग इत्यादी): ५,०००, प्रवास आणि इतर खर्च: ४,२८४, शॉपिंग: १,३९८, मनोरंजन (चित्रपट, फिरणे): १,३३१, गुंतवणूक (SIP): २,०००, इतर बिले: वीज, वाय-फाय, फोन रिचार्ज, पाणी, गॅस. एवढ्या आर्थिक अडचणीतही ज्योतिष ॲपवर ८०० रुपये खर्च केल्याबद्दल तिला खेद वाटत असल्याचे निकिता व्हिडिओमध्ये म्हणते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जण निकिताला धीर देत आहेत, तर काही जण खर्च कमी करण्याचा सल्ला देत आहेत.
एका व्यक्तीने सुचवले की, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवणी दिल्यास तिला पूर्वीच्या नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकते. दुसऱ्या एका व्यक्तीने कमेंट केली, "मी सुद्धा अशाच परिस्थितीतून जात आहे, सध्या माझा भाऊ मला मदत करत आहे." अनेकांनी LinkedIn कन्सल्टिंगबद्दल अधिक जाणून घेण्यास स्वारस्य असल्याचेही व्हिडिओखाली लिहिले आहे.