Big Fall in Stock Market :ट्रम्प यांच्यामुळे शेअर बाजारात मोठी पडझड! सेन्सेक्स 3000 तर निफ्टी 900 अंकांनी खाली! काय आहे यामागचं कारण, जाणून घ्या...
Why Market Crashed Today :ट्रम्प यांच्यामुळे शेअर बाजार पुरता हादरला! सोमवार, 7 एप्रिल रोजी सेन्सेक्स 3000 अंकांनी गडगडला, जवळपास 72,300 वर पोहोचला, तर निफ्टीमध्ये 900 अंकांची घसरण झाली. आणि तो 22,000 च्या खाली आला. सकाळी 10 वाजेपर्यंत सेन्सेक्सचे 30 शेअर्स लाल निशाण्यावर व्यवहार करत होते. टाटा स्टील असो, टाटा मोटर्स असो, किंवा मग इन्फोसिससारख्या मोठ्या कंपन्यासुद्धा दबावाखाली दिसत आहेत. एनएसईच्या सेक्टरल इंडेक्समध्ये निफ्टी मेटलला सर्वाधिक फटका बसला आहे. आयटी, ऑइल अँड गॅस आणि हेल्थकेअर इंडेक्समध्येही मोठी घसरण झाली आहे. नेमकं कारण काय आहे, ते जाणून घ्या...
ट्रम्प यांच्यामुळे झालेल्या गदारोळानंतर जगभरातील बाजार खाली आले आहेत. आशियाई बाजारात जपानचा निक्केई (Nikkei 225) 6 टक्क्यांनी, कोरियाचा कोस्पी इंडेक्स (KOSPI) 4.50 टक्क्यांनी, चीनचा शांघाय इंडेक्स (SSE Composite Index) 6.50 टक्क्यांनी आणि हाँगकाँगचा हँगसेंग (Hang Seng Index) 10 टक्क्यांनी खाली आला आहे. अमेरिकेच्या बाजारातही अशीच परिस्थिती आहे. 3 एप्रिल रोजी डाऊ जोन्स 3.98%, एस अँड पी 500 इंडेक्स 4.84% आणि नॅस्डेक कंपोजिट 5.97% पर्यंत खाली आले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 26% टॅरिफ लावला आहे, त्याचबरोबर जगभरातही टॅरिफ लावला आहे. व्हिएतनामवर 46%, चीनवर 34%, दक्षिण कोरियावर 25%, जपानवर 24% आणि युरोपियन युनियनवर 20% टॅरिफ लावण्यात आला आहे. यानंतर शेअर बाजारात घसरण झाली आहे.
अमेरिकेच्या रेसिप्रोकल टॅरिफला उत्तर म्हणून चीनने शुक्रवार, 4 एप्रिल रोजी अमेरिकेवर 34% चा टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे, जो 10 एप्रिलपासून लागू होईल. याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे.
अमेरिकेच्या टॅरिफमुळे वस्तू महाग होतील आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या वाढीवर होऊ शकतो. मागणी घटल्याने कच्च्या तेलाचे दरही खाली आले आहेत. कमजोर आर्थिक संकेतामुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे आणि त्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे.