
नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ज्या वेगाने विकसित होत आहे, त्यामुळे सायबर सुरक्षेपुढील धोक्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलत आहे. त्यामुळे शेअर बाजाराशी संबंधित कंपन्या आणि व्यावसायिकांसाठी सतत सतर्क राहणं, आपली सिस्टीम अधिक मजबूत करणं आणि विशेष कौशल्ये आत्मसात करणं अत्यंत महत्त्वाचं बनलं आहे, असं मत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स (NISM) येथे आयोजित सेबीच्या 'सायबर डिफेन्स सिम्पोझियम'मध्ये ते बोलत होते.
या कार्यक्रमात बोलताना सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे (SEBI) कार्यकारी संचालक अवनीश पांडे म्हणाले की, सायबर सुरक्षेकडे केवळ बचावात्मक रणनीती म्हणून पाहू नये. ही एक 'चिकाटीची स्पर्धा' (Contest of Persistence) आहे. कारण सायबर गुन्हेगार सतत आपल्या सिस्टीमवर नजर ठेवून असतात आणि अधिक वेगवान व अत्याधुनिक साधनांसह परत हल्ला करतात. पांडे यांनी सांगितलं की, सायबर सुरक्षा प्रोफेशनल्सना २४ तास आणि ३६५ दिवस सतर्क राहावं लागेल. विशेषतः जेव्हा कंपन्यांना AI चे धोके, भू-राजकीय अस्थिरता आणि सप्लाय-चेनच्या असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे.
पांडे यांच्या मते, सेबीने रेग्युलेटेड कंपन्यांसाठी तयार केलेला 'सायबर सिक्युरिटी अँड सायबर रेझिलिअन्स फ्रेमवर्क' (CSCRF) हा मुळात लवचिकतेवर आधारित आहे. पण AI च्या मदतीने होणारे हल्ले सध्याच्या सायबर सुरक्षा फ्रेमवर्कला आव्हान देत आहेत. AI मुळे 'सायबर शस्त्रास्त्र स्पर्धेला प्रचंड वेग' मिळत असून, हे तंत्रज्ञान एकाच वेळी बचावात्मक क्षमता वाढवत आहे आणि दुसरीकडे हल्ल्यांना अधिक धोकादायक बनवत आहे.
पांडे यांनी बाजारातील विविध कंपन्यांच्या सायबर सुरक्षा क्षमतांमध्ये असलेल्या असमानतेवरही बोट ठेवलं. कौशल्ये, संसाधने, डिजिटल पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय क्षमतांमधील फरकांमुळे काही कंपन्यांना सायबर सुरक्षेची किमान पातळी राखण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. ही तफावत संपूर्ण सप्लाय-चेनसाठी धोकादायक ठरू शकते, असंही ते म्हणाले.
पाच दिवस चालणाऱ्या या सिम्पोझियममध्ये कनिष्ठ ते मध्यम स्तरावरील सिक्युरिटीज प्रोफेशनल्स सहभागी झाले आहेत. यात १५ आंतरराष्ट्रीय अधिकारक्षेत्रांतील प्रतिनिधींचा समावेश आहे. या कार्यक्रमात क्लासरूम सेशन्स, 'कॅप्चर द फ्लॅग' स्पर्धा, सायबर सुरक्षेतील नवीन ट्रेंड्सवर चर्चा, मुख्य माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांसाठी टेबलटॉप एक्सरसाइज आणि सायबर सुरक्षा सोल्यूशन्सचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
NISM चे संचालक शशी कृष्णन यांनी सांगितले की, त्यांची संस्था एक इमर्सिव्ह लॅब, जनजागृती आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यात वाढ करून सायबर सुरक्षा क्षमता मजबूत करण्यासाठी काम करत आहे. NISM लवकरच GIFT IFSC मध्ये बेसिक आणि ॲडव्हान्स स्तरावर 'सायबर सुरक्षा आणि सायबर रेझिलिअन्स सर्टिफिकेशन' सुरू करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या सर्टिफिकेशनमध्ये सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर (SOC) ऑपरेशन्स, थ्रेट डिटेक्शन, व्हल्नरेबिलिटी असेसमेंट अँड पेनिट्रेशन टेस्टिंग (VAPT), सायबर सुरक्षा ऑडिट, इन्सिडंट डिटेक्शन, सायबर रेझिलिअन्स, बिझनेस कंटिन्युइटी, डिझास्टर रिकव्हरी, थर्ड-पार्टी रिस्क मॅनेजमेंट आणि रेग्युलेटरी रिपोर्टिंग यांसारख्या क्षेत्रांचा समावेश असेल. कृष्णन म्हणाले की, हा उपक्रम इतर नियामकांसाठी एक मॉडेल म्हणून काम करू शकतो. त्यांनी सायबर सुरक्षा तज्ज्ञांना या कोर्सची मोफत उपलब्ध असलेली माहिती तपासण्याचे आणि शेअर बाजारासाठी ते अधिक समर्पक बनवण्यासाठी अभिप्राय देण्याचे आवाहन केले.