स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर लीक झाल्याचा संशय आहे. तब्बल ३,८९७ ग्राहकांची वैयक्तिक माहिती उघड झाल्याने बँकेने आता तातडीने चौकशी सुरू केली आहे.
एसबीआय ग्राहकांना मोठा धक्का.. डार्क वेबवर तुमचा पर्सनल डेटा?
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांवर सायबर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. डार्क वेबवर तब्बल ३,८९७ ग्राहकांची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचा संशय आहे. या घटनेनंतर बँकेने तातडीने अलर्ट जारी करत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. ग्राहकांच्या माहितीचा गैरवापर होऊ नये म्हणून बँक सर्व आवश्यक पावले उचलत आहे.
या डेटा लीक प्रकरणाबाबत १६ ऑक्टोबर रोजी एसबीआयला महत्त्वाचा अलर्ट मिळाला होता. बँकेचे थ्रेट इंटेलिजन्स सर्व्हिस प्रोव्हायडर, डिफेन्स सायबर एजन्सी आणि इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) यांनी बँकेला ही माहिती दिली. डार्क वेबवर ग्राहकांचा डेटा असल्याची माहिती मिळताच बँक अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलली.
35
डार्क वेबवर नेमकी कोणती माहिती लीक झाली?
डार्क वेबवर सापडलेल्या सुमारे ३,७५,००० रेकॉर्ड्सची एसबीआयने प्राथमिक तपासणी केली. या तपासणीत ३,८९७ एसबीआय ग्राहकांची वैयक्तिक माहिती असल्याचे निष्पन्न झाले. यात ग्राहकांची नावे, लिंग, नोंदणीकृत मोबाईल नंबर, जन्मतारीख, ईमेल आयडी आणि पत्ता यांचा समावेश आहे. याशिवाय ब्रांच आणि कस्टमर इन्फॉर्मेशन फाईल (CIF) आयडेंटिफायर्स, लीड आयडी आणि लोन प्रोसेसिंगचा मेटाडेटा देखील लीक झाल्याचे समजते.
सायबर इन्सिडेंट रिस्पॉन्स.. स्वतंत्र एजन्सीकडून तपास
डेटा लीकची बातमी येताच एसबीआयने सायबर इन्सिडेंट रिस्पॉन्स प्रोटोकॉल लागू केले. या लीकचा फटका किती जणांना बसलाय हे तपासण्यासाठी CERT-In च्या यादीतील एका स्वतंत्र सायबर सिक्युरिटी एजन्सीची नियुक्ती केली आहे. लीक झालेला डेटा खरा आहे का, तो कुठून आला आणि यामुळे ग्राहकांना काय धोका आहे, याचा सखोल तपास ही एजन्सी करत आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपायही वेगाने राबवले जात आहेत.
55
बँकिंग सेवांवर कोणताही परिणाम नाही
या संशयित डेटा लीकमुळे बँकेच्या दैनंदिन कामकाजावर किंवा आर्थिक स्थितीवर कोणताही परिणाम झालेला नाही, असे एसबीआयने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. बँकेचे मुख्य कामकाज नेहमीप्रमाणे सुरू असून ग्राहकांच्या सेवांमध्ये कोणताही अडथळा आलेला नाही. बँक या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून तपास पूर्ण होईपर्यंत नियमांनुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असेही एसबीआयने सांगितले.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .