
नवी दिल्ली: चीनी स्मार्टफोन ब्रँड Realme या महिन्यात भारतात आपला पहिला 10,000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. Realme ने 2025 च्या मे महिन्यात 10,000mAh फोनचा टीझर प्रसिद्ध केला होता, परंतु हा मोबाईल बाजारात कधी येईल हे कंपनीने स्पष्ट केले नव्हते. मात्र, आता या फोनला BIS प्रमाणपत्र मिळाले असून तो लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार असल्याचे नवीन रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.
Realme RMX107 या मॉडेल नंबरच्या मोबाईल फोनला 22 डिसेंबर 2025 रोजी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) चे प्रमाणपत्र मिळाले आहे आणि हा फोन जानेवारी 2026 मध्ये सादर केला जाईल, असे टिपस्टर योगेश ब्रार यांनी म्हटले आहे. Realme चे उत्पादन विपणन प्रमुख फ्रान्सिस वोंग यांनी X वर बॅटरी पॉवर दाखवणाऱ्या स्मार्टफोनचा टीझर शेअर केल्याने या चर्चांना उधाण आले आहे. वोंग यांनी दाखवलेला फोनच आगामी 10,000mAh क्षमतेचा फोन असल्याचे म्हटले जात आहे.
10,000mAh क्षमतेच्या स्मार्टफोनची जाडी 8.5mm असेल आणि वजन 200 ग्रॅमपेक्षा थोडे जास्त असेल, असे Realme ने गेल्या वर्षी जाहीर केले होते. फोनमध्ये मोठी बॅटरी बसवण्यासाठी Realme अंतर्गत भागांसाठी मिनी डायमंड आर्किटेक्चर वापरणार आहे. या फोनमध्ये जगातील सर्वात पातळ मेनबोर्ड असेल, असेही संकेत आहेत. हा 10,000mAh क्षमतेचा फोन Realme च्या मिड-रेंज P सीरीज लाइनअपमधील असल्याच्या बातम्या आहेत, परंतु याला दुजोरा मिळालेला नाही. या सिरीजमध्ये 10,000mAh बॅटरीसह येणारा हा पहिला फोन असण्याची शक्यता आहे.
चीनी ब्रँड्समध्ये 7,000mAh बॅटरीचे फोन सामान्य झाले असताना, कंपन्या आता अधिक क्षमतेच्या बॅटरी बसवण्यासाठी स्पर्धा करत आहेत. चीनी स्मार्टफोन निर्माता OnePlus आपल्या आगामी Nord 6 लाइनअपमध्ये 9,000mAh क्षमतेचा फोन लाँच करणार असल्याचे रिपोर्ट्स आहेत.