Punjab Lottery Winner : नवऱ्याची मजुरी, घरात गरिबी; पण 7 रुपयांच्या तिकीटाने रातोरात करोडपती बनली

Published : Oct 23, 2026, 11:00 AM IST
Punjab Lottery Winner : नवऱ्याची मजुरी, घरात गरिबी; पण 7 रुपयांच्या तिकीटाने रातोरात करोडपती बनली

सार

पंजाबच्या कोटकपुरा येथील एका मजुराची पत्नी बिमला देवी यांनी अवघ्या ७ रुपयांत सिक्कीम राज्य लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. याच तिकीटाने त्यांना तब्बल १ कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकून दिला आहे.

नवी दिल्ली : पंजाबमधील एका गरीब कुटुंबाचे नशीब अवघ्या ७ रुपयांच्या लॉटरी तिकीटाने फळफळले आहे. या कुटुंबाची गरिबी आता दूर झाली असून त्यांना तब्बल एक कोटी रुपयांचा जॅकपॉट लागला आहे. पंजाबच्या फरीदकोट जिल्ह्यातील कोटकपुरा येथे राहणाऱ्या एका मजुराच्या पत्नीने ही लॉटरी जिंकली आहे. कोटकपुरा रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या 'स्टार लॉटरी' दुकानातून तिने हे तिकीट खरेदी केले होते.

नशिबाने मारली पलटी

सिक्कीम राज्य सरकारची ही लॉटरी जिंकण्यात या कुटुंबाला यश आले आहे. यामुळे आता या गरीब कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारणार असून मुलांच्या भविष्याची चिंताही मिटली आहे. बिमला देवी असे या महिलेचे नाव असून तिचा नवरा मजुरीचे काम करतो. काही दिवसांपूर्वी बिमला देवी घरातील सामान आणण्यासाठी बाजारात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना अचानक लॉटरीचे तिकीट घेण्याची इच्छा झाली. त्यांनी खिशातून फक्त ७ रुपये काढले आणि एक तिकीट विकत घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, लॉटरीचा निकाल लागण्याच्या बरोबर एक दिवस आधी त्यांनी हे तिकीट घेतले होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा निकाल जाहीर झाला, तेव्हा त्यांच्या तिकीटाला १ कोटी रुपयांचे बक्षीस लागल्याचे समजले. ही अनपेक्षित आणि आनंदाची बातमी ऐकून कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. लॉटरी लागल्याचे समजताच हे कुटुंब थेट तिकीट खरेदी केलेल्या दुकानात पोहोचले.

तिथे त्यांनी दुकान मालक नरेश मोंगा यांना पेढे भरवून आपला आनंद साजरा केला. एवढंच नाही तर दुकानाबाहेर भांगडा करून त्यांनी जल्लोष केला. यावर बोलताना बिमला देवी म्हणाल्या, "आमच्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी या पैशांची खूप मदत होईल. आता आम्ही आमच्या मुलांचा चांगला सांभाळ करू शकू आणि त्यांना उत्तम शिक्षण देऊ. थोडक्यात सांगायचं तर आमचं नशीबच बदललं आहे. पण एवढी मोठी रक्कम कशी वापरायची हे आम्हाला अजूनही समजत नाहीये, त्यामुळे थोडी भीतीही वाटत आहे."

बिमला देवी पुढे म्हणाल्या की, "आम्ही सर्व कुटुंबीय एकत्र बसून या पैशांचं काय करायचं याचा निर्णय घेऊ. मुलांचं भविष्य सुरक्षित करणं ही आमची पहिली प्राथमिकता आहे. त्यामुळे एखादा छोटासा व्यवसाय सुरू करण्याचा आमचा विचार आहे."

लॉटरी दुकानाचे मालक नरेश मोंगा यांनी सांगितले की, ते गेल्या सहा महिन्यांपासून हा व्यवसाय करत आहेत. नुकतेच त्यांनी आपले दुकान रेल्वे स्टेशनजवळ हलवले होते. त्यांच्या दुकानातून विकल्या गेलेल्या तिकीटांवर यापूर्वीही अनेकांनी लाखो रुपयांची बक्षिसे जिंकली आहेत. पण त्यांच्या दुकानातून १ कोटी रुपयांचा जॅकपॉट लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. या कुटुंबाच्या विजयामुळे आपल्यालाही खूप आनंद झाल्याचे नरेश मोंगा यांनी सांगितले.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Best Phones Under 30000 : 30 हजारांच्या बजेटमध्ये नवीन फोन घेताय? हे 5 भन्नाट ऑप्शन्स नक्की पाहा
Post Office RD Scheme : मार्केट रिस्क झिरो... पोस्टाच्या या स्कीममध्ये तुमचे पैसे करा डबल, योजना काय?